प्रसिद्धीसाठी डिजिटल एलईडी स्क्रीन ची व्यवस्था..
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने वेंगुर्ला नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या गणेश चतुर्थी नियोजन सभेत सर्वपक्षीय सदस्य, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत सर्वांनी एकमताने ‘बॅनरमुक्त वेंगुर्ला’ करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. असे असले तरी नागरिकांक प्रसिद्धीसाठी शहरात पाच ठिकाणी डिजिटल ‘एलईडी स्क्रीन’ ची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेंगुर्ले नगरपरिषद कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सभापती गौरी मराठे, सचिन शेटे, नगरसेवक सदानंद गिरप आदी उपस्थित होते. वेंगुर्ले मध्ये सण, उत्सव, वाढदिवस, शुभेच्छा संदेश तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात बॅनर लावले जातात. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होण्याबरोबरच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन यापुढे गणेश चतुर्थीसह कोणत्याही कालावधीत शहरात बॅनर लावण्यास प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बॅनरला पर्याय म्हणून नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील पाच प्रमुख ठिकाणी डिजिटल एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. यामध्ये दाभोली नाका, वेंगुर्ला मार्केट, हॉस्पिटल नाका, पॉवर हाऊस आणि पिराची दर्गा या ठिकाणांचा समावेश आहे.
नागरिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा, सण-उत्सवांच्या शुभेच्छा किंवा इतर संदेश या एलईडी स्क्रीनवर प्रसिद्ध करता येणार आहेत. यासाठी संबंधित नागरिकांनी आपला संदेश नगरपरिषदेकडे द्यायचा असून, त्यांच्या मागणीनुसार एक-दोन दिवस, चार दिवस, आठ दिवस किंवा पंधरा दिवस अशा कालावधीसाठी संदेश प्रदर्शित करता येणार आहे.
या डिजिटल प्रसिद्धीसाठी आकारण्यात येणारे शुल्क अत्यंत वाजवी स्वरूपाचे असेल. पारंपरिक बॅनर तयार करण्यासाठी जेवढा खर्च येतो, त्याच्या आसपासच शुल्क ठेवण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न राहणार आहे. नगरपरिषदेला यातून मोठे उत्पन्न मिळविणे हा उद्देश नसून, वेंगुर्ला शहर बॅनरमुक्त करणे हा मुख्य उद्देश आहे, असे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्पष्ट केले.
‘बॅनरमुक्त वेंगुर्ला’ हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व नागरिक, व्यापारी, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहनही नगराध्यक्ष गिरप यांनी केले. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरच हा निर्णय जाहीर करण्यात आल्याने आगामी सणासुदीच्या काळात शहराचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यास मदत होणार आहे. वेंगुर्ला शहराला बॅनरच्या गर्दीतून मुक्त करून डिजिटल माध्यमातून शुभेच्छा व संदेश देण्याची सुविधा सुरू झाल्यावर असा निर्णय घेणारी वेंगुर्ले नगरपरिषद पहिली नगरपरिषद ठरणार असल्याचे श्री गिरप यांनी सांगितले.













