आडाळी एमआयडीसी लाँगमार्च आणि विकासाचा उंबरठा…!
संतोष वायंगणकर
दोडामार्ग तालुका हा गोवा राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेला तालुका, अगदी हाकेच्या अंतरावर म्हणावा तसा १५-२० कि.मी. अंतरावरचा तालुका. या दोडामार्ग तालुक्याची निर्मिती विद्यमान केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे यांच्या शिवसेना-भाजपा युती सरकारच्या कार्यकाळात १९९९ साली झाली. आज दोडामार्ग तालुक्याच्या निर्मितीला तब्बल २३ वर्षे झाली आहेत. म्हणजे खरंतर दोडामार्ग तालुका वयात आला नव्हे तर वय वाढलय. पण विकास प्रक्रियेत हा तालुका आजही रांगतोय. मधल्या कालावधीत तिलारी पाटबंधारे प्रकल्प गोवा व महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त सहकार्यातून अंतिम टप्प्यात आहे. कोणत्याही भागात जेव्हा एखादा पाटबंधारे प्रकल्प उभा रहातो तेव्हा विकासाची गंगा आपोआपच दारापर्यंत आलेली असते. समृद्धीसाठी कोणाच्याही दारात जावं लागत नाही. परंतु असं काहीच घडल नाही. घडतही नाही. याचा शोध आणि आत्मपरिक्षण दोडामार्गवासियांनी करण्याची आवश्यकता आहे. ‘तुझं आहे तुजपाशी’ अशीच काहीशी अवस्था आहे. ना. नारायण राणे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री झाले तेव्हा २०१३ साली दोडामार्ग तालुक्यातील आडाळी भागात एमआयडीसीची प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता शेतकऱ्यांना तत्काळ जमिनीचा मोबदला दिला गेला. शेतकऱ्यांनी विरोधाची भुमिका न घेता सहकार्याची भुमिका घेतली. आडाळी एमआयडीसीची प्रक्रिया झाली त्याला १० वर्षे झाली. परंतु यातली किमान पाचवर्षे ही कोरोना आणि त्यानंतरचा कालावधी यामध्ये चालली आहेत. आडाळीमध्ये उद्योग उभे राहिले पाहिजेत. याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. आडाळीचे सरपंच पराग गावकर यांनी आडाळी एमआयडीसी संदर्भात जाग आणण्यासाठी दोडामार्ग ते बांदा असा लाँगमार्च काढला. या लाँगमार्चमध्ये अनेक राजकिय पक्षांनी आपला सहभाग जाहीर केला. त्याप्रमाणे सर्व सहभागी झाले. यात विशेष म्हणजे त्या भागातील जनताच त्यात सहभागी झाली होती. एखाद्या भागाच्या विकासासाठी आग्रह धरणे, लोकशाहीमार्गाने आंदोलन करणे यात काही गैर नाही. लोकशाहीत सरकार कुणाचेही असले तरीही त्याला जाग करावं लागत. यामुळे लाँगमार्च काढण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. आता पुढे काय ? असा प्रश्न आपोआपच निर्माण होतो. राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी त्यासंदर्भाने सरकारची भुमिकाही स्पष्ट केली आहे. केंद्रिय आयुषमंत्री ना. श्रीपाद नाईक यांनीही यापूर्वीच वनौषधी प्रकल्पाचे सुतोवाच केले आहे. परंतु कोणतेही उद्योग येण्यासाठी ज्या पायाभुत सुविधांची निर्मिती झाली पाहिजे ती एका कालबद्धतेत होण्याची आवश्यकता आहे. दोडामार्गपासून मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या २० कि.मी. वर आहे. दोडामार्ग तालुक्याची विकासप्रक्रिया तालुक्याच्या उंबरठ्यावर उभी आहे. विकास हा काही एकटा-दुकटा येत नाही तो अनेक बाबतीत अनेक मार्गानी होत असतो. तालुक्याच्या जनतेने त्यासाठी तयार असल पाहिजे. दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी परप्रांतियांना अगोदरच दिल्या आहेत. या जमिनी कवडीमोल दराने दिल्या आहेत. आज जेव्हा विकास विविध रूपाने येऊ पहात आहे. तेव्हा त्या विकासाचा फायदा स्थानिकांना घेता येणे आवश्यक आहे. दोडामार्ग तालुक्याच्या बाबतीत जाता-जाता काही सांगितलच पाहिजे. दोडामार्ग तालुक्यात राजकिय पुढाऱ्यांचा कोणाचा पायपोस कोणातच नाही. सार अविश्वासाच राजकारण, कोणाचाच कोणावरही विश्वास नाही. सकाळी ठरलेल दुपारी तसच घडेल याबद्धल ठामपणाने कोणीही सांगू शकत नाही इतकी अस्थिरता आणि अविश्वास इथे आहे. तालुक्यातील सर्वच पक्षिय पुढाऱ्यांमध्ये विकासाचा विचार केंद्रस्थानी नाही. वैयक्तिक स्वार्थ आणि इगो यामध्ये इथला विकास खुंटला आहे. दोडामार्ग तालुक्याच्या विकासाची पालखी सर्वांनी खांद्यावर घेतली पाहिजे. त्यासाठी जिथे पालखी हा शब्द येतो तिथे कोणीही छोटा-मोठा नसतो पालखीसोबत फिरणारी सारी रयत असते याचे भान आणि जाणिव सर्वांनी ठेवली तर विकासातील सर्व अडथळे आपोआप दूर होऊ शकतात. आजच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाला दोडामार्गला जितका वाव आहे तितका आणखी कोणत्याच तालुक्याला नाही. परंतु तालुक्यातील सर्वांना सोबत घेऊन जाईल असं नेतृत्व इथे नाही. सुरेश दळवींसारख नेतृत्व शारिरीक थकव्याने थांबल आहे. आणि अन्य आहेत त्यात अनेकांकडे नेतृत्वाचे गुण आहेत. परंतु त्यातले अनेक मनाने फारच चौकटीत वावरणारे आहेत. सर्वांना सोबत घेऊन गेल्याशिवाय दोडामार्ग तालुक्याचा विकास उंबरठा ओलांडून आत येणार नाही. यासाठी तालुक्यातील जनतेने, इथल्या पत्रकारांनी, माध्यमांनी विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. बाकी तो सब चलता रहता है.!
*(फोटो- )











