महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गवाणे च्या अध्यक्षपदी गोविंद करंबेळे यांची बिनविरोध निवड

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील गवाणे गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी गोविंद विठ्ठल करंबेळे यांची सन २०२६-२७ या वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली.

गवाणे ग्रामपंचायतीची ग्रामसभा २१ ऑगस्ट रोजी झाली. या ग्रामसभेमध्ये गोविंद करंबेळे यांच्या गेली दोन वर्ष समितीच्या कामकाजाचा आढावा पाहता ग्रामसभेने पुन्हा अध्यक्ष म्हणून त्यांना संधी दिलेली आहे. कायदा सुव्यवस्था सांभाळत असताना गावामध्ये सामाजिक उपक्रम यामध्ये आरोग्य शिबिर, गावातील विधवा प्रथा बंद करणे, शासनाचे सामाजिक उपक्रम राबवणे असे अनेक विषय त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये केलेले आहेत.

सन २००७ या वर्षांमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन झाल्यापासून त्यांनी गेली सहा वर्ष तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेले आहे.

समितीच्या कार्याचे कौतुक करताना व भावी काळासाठी शुभेच्छा देताना सामाजिक कार्यकर्ते अनिरुद्ध कांबळे यांनी भारताचे संविधान प्रत देऊन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. गवाणे गावचे सरपंच भिमराज कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व उपस्थित ग्रामस्थांनी नूतन तंटामुक्त समितीचे अभिनंदन केले.