२ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त
लांजा:
बोलेरो पिकअप वाहनातून दोन बैलांची अत्यंत निर्दयतेने व बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्यातील मौजे गोविळ बस स्टॉपजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपी गणेश गणपत लांबोरे (वय २७ वर्षे, रा. वाडगाव रोड, कालभैरवनगर, धंदरे, ता. लांजा, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप टेम्पोमधून (क्र. MH 08 AP 1211) दोन बैलांची लांजा ते गोविळ रस्त्याने वाहतूक करत होता.
तपासणीदरम्यान, वाहनाच्या हौद्यात हवा खेळती राहण्यासाठी (वायू विसर्जनासाठी) पुरेशी जागा न ठेवता तो चारही बाजूंनी बंदिस्त करण्यात आला होता. बैलांना हालचाल करता येऊ नये अशा प्रकारे आखूड दोरीने बांधून दाटीवाटीने कोंबण्यात आले होते. तसेच प्रवासात जनावरांना दुखापत होऊ नये म्हणून वाहनात कोणतेही पार्टीशन केले नव्हते. याशिवाय गुरांची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र न घेणे, वाहनात चारा-पाण्याची किंवा प्रथमोपचार किटची व्यवस्था नसणे, तसेच वाहनावर गुरे वाहतुकीचा फलक न लावता ही वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ लाख रुपयांची बोलेरो पिकअप गाडी आणि प्रत्येकी १० हजार व ११ हजार रुपये किमतीचे दोन गावठी बैल असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरज मौला नाईकवाडे (वय ४२, नेमणूक लांजा पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गणेश लांबोरे याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) (डी)(ई)(एफ), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, प्राण्यांची वाहतूक नियम १९७८ चे विविध नियम तसेच मोटार वाहन कायद्यानुसार लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.













