ग्रामीण विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत जाण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देण्याचा संकल्प; पहिल्याच बैठकीत १० विद्यार्थ्यांची नोंदणी
कुडाळ : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी संस्थान मराठा समाज कुडाळ व मराठा समाज कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथे स्पर्धा परीक्षा वर्ग व अभ्यासिका सुरू करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली असून, बैठकीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ग्रामीण व निमशहरी भागातील अनेक गुणवंत विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. मात्र, अभ्यासासाठी स्वतंत्र जागा, अद्ययावत पुस्तके, संदर्भ साहित्य आणि अनुभवी मार्गदर्शनाची कमतरता जाणवते. ही अडचण दूर करण्याच्या उद्देशाने कुडाळ येथे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अभ्यासाची सुविधा आणि परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी शांत व शिस्तबद्ध अभ्यासाचे वातावरण, योग्य बैठक व्यवस्था, विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके, संदर्भ साहित्य तसेच अनुभवी तज्ज्ञांचे Guest Lectures उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. MPSC, UPSC, सरळसेवा भरती, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक यांसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्याचा मानस आहे.
विशेष म्हणजे, या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच बैठकीदरम्यान १० विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून कुडाळ व परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘गुणवंत विद्यार्थ्यांना संधी, योग्य मार्गदर्शन आणि यशासाठी पोषक वातावरण’ या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ आर्थिक किंवा सुविधांच्या अभावामुळे स्पर्धा परीक्षेपासून दूर राहू नये, तर उपलब्ध सुविधांचा लाभ घेत शासकीय सेवेत आपले स्थान निर्माण करावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे
कुडाळ व परिसरातील MPSC, UPSC, सरळसेवा भरती, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक तसेच अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली नोंदणी करावी, असे आवाहन सावंतवाडी संस्थान मराठा समाज कुडाळ व मराठा समाज कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
बैठकीस नंदू गावडे, डॉ. सौ. काजरेकर मॅडम, स्वाती सावंत मॅडम, गुरुनाथ धुरी, स्वामी सावंत सर व सुधीर सावंत सर आदी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी तसेच नोंदणी करिता 9527754708, 9421147160, 7741966760 संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.












