प्रशासकीय यंत्रणा, ग्रा.पं.पदाधिकारी आणि शेतकरी बांधव यांच्या एकजूटीतून शंभर टक्के उद्दिष्ट साध्य
स्वप्निल कदम l कुडाळ: या महाराष्ट्र शासनाच्या ‘दुष्काळ ट्रिगर १’ अंतर्गत शेती नुकसानीचे पंचनामे अत्यंत वेगाने व पारदर्शकतेने पूर्ण करत कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कठीण दुष्काळी परिस्थितीच्या काळात गावातील प्रत्येक बाधित शेतकऱ्याला शासनाची मदत वेळेत मिळावी यासाठी तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतीने प्रशासकीय यंत्रणेसोबत खांद्याला खांदा लावून शंभर टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट साध्य करत नवा आदर्श निर्माण केला आहे.
सध्या संपूर्ण राज्यभरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गाच्या अनियमिततेमुळे गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाची झालेली ओढ, पाण्याचे कमी झालेले प्रमाण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकरी वर्ग पूर्णपणे खचून गेला असून, शासनाकडून मिळणारी मदत हाच त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरत आहे. या पार्श्वभूमीवरशेती नुकसानीचे पंचनामे अत्यंत वेगाने व पारदर्शकतेने पूर्ण करत तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतीने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
पंचनाम्याच्या उद्दिष्टपूर्तीकडे आणि आकडेवारीकडे दृष्टिक्षेप टाकल्यास, गावाचे एकूण निर्धारित उद्दिष्ट ११३ हेक्टर इतके होते. मात्र, प्रत्यक्षात ११६.८५ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण करून ग्रामपंचायतीने शंभर टक्क्यांहून अधिक कामगिरी नोंदवली आहे. यामुळे गावातील एकूण १६५ बाधित व लाभार्थी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार असून, उद्दिष्टापेक्षा जास्त क्षेत्राचे अचूक पंचनामे पूर्ण करण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.
ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे, कृषी विभाग, महसूल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर व बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि तत्काळ पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. महाराष्ट्र शासनाच्या सरसकट निकषानुसार गावातील प्रत्येक लहान-मोठ्या शेतकऱ्याला शेती नुकसानीची भरपाई मिळावी, या एकाच ध्येयाने संपूर्ण टीमने दिवस-रात्र एक करून हे काम तडीस नेले. या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. तसेच जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश रवींद्र कानडे यांनी केलेल्या आवाहनाला शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या यशस्वी कामगिरीत गावातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. यामध्ये सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच सौ. धनश्री गवस, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मेस्त्री, सौ. माधवी कानडे, सौ. रोहिणी हळदणकर, अजय डिचोलकर, गुणाजी जाधव, संतोष डिचोलकर आणि सौ. प्रणाली साटेलकर यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच ग्रामपंचायत अधिकारी भूषण बालम, कृषी सहाय्यक सौरभ भगत, तलाठी जितेंद्र खेताडे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाने याकामी मोलाचे सहकार्य केले.
प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि स्वतः शेतकरी बांधव यांनी दाखवलेली एकजूट वाखाणण्याजोगी आहे. या अभूतपूर्व सहकार्याबद्दल सरपंच रामचंद्र परब यांनी सर्व ग्रामस्थ, महसूल व कृषी अधिकारी, कर्मचारी आणि जिल्हा परिषद प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. सर्व घटकांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत हे शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करून जिल्ह्यात अव्वल कामगिरी करू शकली, अशी कृतज्ञतेची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.













