वेंगुर्ले चा विद्यार्थी सर्वेश तांडेल “पखवाज अलंकार” परीक्षेत संपूर्ण भारतातून प्रथम..

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या नवी मुंबईतील समारंभात पदवी प्रदान

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

वेंगुर्ले : दाजी नाईक
श्री चिंतामणी संगीत विद्यालय, वेंगुर्लेचे विद्यार्थी श्री. रामचंद्र उर्फ सर्वेश नारायण तांडेल यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबईच्या नोव्हेंबर २०२५ सत्रातील “पखवाज अलंकार” परीक्षेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

वाशी, नवी मुंबई येथे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या मुंबई विभागातर्फे आयोजित दीक्षांत व पदवीप्रदान समारंभात तांडेल यांना अलंकार पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी प्रा. सच्चिदानंद जोशी, सदस्य सचिव, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली, तसेच प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, डॉ. देवेंद्र कुलकर्णी, श्री. जामिनीकांत मिश्र, श्री. सुनील हुकीरे, पं. सुधाकर चव्हाण व प्रा. विश्वास जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या उल्लेखनीय यशाबद्दल तांडेल यांना पं. गणेश अण्णा चौधरी स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पखवाज वादनातील मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि कलाप्रेमाचे हे यशस्वी फलित असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.. श्री. तांडेल यांच्या या प्रवासात श्री. निलेश पेडणेकर सर, पं. दासोपंत स्वामी आळंदीकर, कै. पं. गोविंद भिलारे गुरुजी तसेच गुरुबंधू श्री. मनिष तांबोस्कर (पखवाज अलंकार) व श्री. तेजस मेस्त्री (एम.ए. गोल्ड मेडलिस्ट, म्युझिक) यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच श्री. गणेश महाराज शेडगे (अलंकार) व श्री. मंगेश महाराज कदम (अलंकार) यांचेही विशेष सहकार्य लाभल्याचे तांडेल यांनी सांगितले.

या यशाबद्दल श्री चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रविण कांदळकर, श्री. भाई वेंगुर्लेकर तसेच सर्व संचालकांनी तांडेल यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सांगीतिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सर्वेश तांडेल हे सध्या पराग विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, भांडुप येथे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशामुळे वेंगुर्ल्यासह सिंधुदुर्गच्या संगीत क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.