देवलीत १९२ महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण!

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने देवली, काळेथर व वघावणे या गावांतील एकूण १९२ महिला शेतकऱ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच एनसीएमसी महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवासी कार्डचेही वितरण करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना सरपंच शाम वाक्कर म्हणाले की, “शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्र व प्रवासी कार्डमुळे महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ घेणे अधिक सोपे होईल आणि त्यांचा आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाला चालना मिळेल.”

यावेळी सरपंच शाम वाक्कर, सदस्य सचिन मालवणकर, माजी सदस्य राजश्री मालवणकर, ग्रामसंघ अध्यक्ष संजना आचरेकर, ग्रामपंचायत अधिकारी सोमनाथ घंटे यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या.

या उपक्रमांतर्गत देवली गावातील १४०, काळेथर गावातील ३६, तर वघावणे गावातील १६ महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. अशाप्रकारे एकूण १९२ महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचा लाभ मिळाला. या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, उपकृषी अधिकारी धनंजय गावडे आणि सहाय्यक कृषी अधिकारी किशोर कदम यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. महिला शेतकरी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सीआरपी मंजुषा मेस्त्री, दीक्षा देऊलकर आणि रूपल आचरेकर यांनी विशेष मेहनत घेतली.