उर्वरित मोजणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची नगरपंचायत प्रशासनाची माहिती
कणकवली : कणकवली शहराच्या १९९९ च्या विकास आराखड्यात मुडेडोंगरी परिसरातील सुमारे ११०० गुंठे क्षेत्र क्रीडांगणासाठी आरक्षित करण्यात आले आहे. गेल्या २६-२७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला आता गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यातील २४८ गुंठ्याची मोजणी करताना नागरिकांनी विरोध केला. दरम्यान यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधण्यात आला, यावेळी २४८ गुंठ्यांची मोजणी करून उर्वरित ११०० गुंठे आरक्षित क्षेत्र संपादित करण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्याचे नगरसेवक राकेश राणे यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे याठिकाणी जागा मोजणी सुरू आहे मात्र कोणाचेही नुकसान नको. मोजणी करताना सर्व जागेची मोजणी करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.
दरम्यान नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, अक्षता रोळे, सुमित कुबल, मनोज तोरसकर, सचिन नेरकर, दशरथ मांडवे, यांनी तातडीने मुडेश्वर मैदान येथे जात ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत ग्रामस्थांना समजवून सांगून थांबवलेली मोजणी उर्वरित आरक्षित क्षेत्राच्या मोजणीसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन नगरपंचायतीने दिले आहे, यानंतर मोजणी सुरू करण्यात आली.
यावेळी नगरसेवक राकेश राणे, तेजस राणे, उमेश वाळके, निकित मुरकर, औदुंबर राणे, अजित राणे, नाना राणे, आबाजी राणे, गुरु राणे, सखाराम राणे, अभय राणे, सागर राणे, राकेश पिळणकर, राजेश पिळणकर, किशोर राणे, सुनील राणे, ओंकार राणे,दिपक राणे, नारायण पिळणकर, अमृत राणे, महेश राणे, दत्ताराम साटम, अनंत साटम आदी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले की, नवीन प्रारूप विकास आराखड्याची प्रक्रिया सुरू असतानाच नगरपंचायतीने महत्त्वाची भूमिका घेत २४८ गुंठ्यांच्या मोजणीचा प्रस्ताव दाखल केला. प्रांताधिकारी, वन विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या समन्वयातून या क्षेत्राची मोजणी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला काही ग्रामस्थांनी केवळ २४८ गुंठ्यांच्या मोजणीला विरोध केला होता. संपूर्ण ११०० गुंठे क्षेत्राची मोजणी करावी, अशी त्यांची मागणी होती. याबाबत नगरपंचायत प्रशासन, सीओ, उपनगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी तसेच जमीन मालक आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर २४८ गुंठ्यांच्या मोजणीला विरोध नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. मात्र, उर्वरित आरक्षित क्षेत्राच्या मोजणीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
पुढे श्री. पारकर म्हणाले, उर्वरित क्षेत्राच्या मोजणीसाठी नगरपंचायतीकडून लवकरच नवीन प्रस्ताव देण्यात येईल. संबंधित महसूल, भूमी अभिलेख आणि वन विभागाकडून तारीख निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मोजणी केली जाईल. जमिनीचा मोबदला, झाडे आणि बांधकामांचे मूल्यांकन संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून करण्यात येणार असून, त्यानुसार जमीन मालकांना मोबदला दिला जाईल, असे श्री. पारकर यांनी सांगितले.
या कामासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. त्यापैकी ३ कोटी ६० लाख रुपये उपलब्ध असून, ४० लाख रुपये नगरपंचायतीकडून देण्यात येणार आहेत. भविष्यात निधी उपलब्धतेनुसार संपूर्ण ११०० गुंठे क्षेत्र क्रीडांगणासाठी विकसित करण्यात येणार असल्याचे श्री. पारकर यांनी स्पष्ट केले. जमीन मालकांची संमती असल्यास आरक्षणाबाहेरील उर्वरित क्षेत्रही क्रीडांगणासाठी घेण्याचा विचार नगरपंचायत करणार आहे.
एखाद्या जमीन मालकाच्या १० गुंठ्यांपैकी ५ गुंठे आरक्षणात जात असतील आणि उर्वरित ५ गुंठ्यांचा उपयोग होत नसेल, तर जमीन मालकाची संमती व मूल्यांकनानुसार मोबदला मान्य असल्यास संपूर्ण १० गुंठे क्षेत्र घेण्याचा विचार केला जाईल, असेही श्री. पारकर यांनी सांगितले.
दरम्यान, नगरसेवक राकेश राणे म्हणाले की, मुडेडोंगरी येथील ११०० गुंठे क्षेत्र स्टेडियमसाठी आरक्षित आहे. नगरपंचायतीने सध्या २४८ गुंठ्यांची मोजणी सुरू केली आहे. मात्र, ग्रामस्थांची मागणी सुरुवातीपासूनच संपूर्ण ११०० गुंठ्यांची मोजणी करण्याची होती. उर्वरित संपूर्ण क्षेत्राच्या मोजणीबाबत नगरपंचायतीने लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसारच २४८ गुंठ्यांच्या मोजणीला परवानगी देण्यात आली आहे, असे नगरसेवक राकेश राणे यांनी सांगितले.













