वैभववाडी तालुक्यात हळहळ
वैभववाडी प्रतिनिधी :
नाधवडे गावचे रहिवासी, वकील अँड. विवेक विनोद गोखले (वय ३३) यांचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
अँड. विवेक गोखले यांना रविवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी कणकवली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कुडाळ येथे घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. अँड. गोखले हे वकिली व्यवसायासोबत सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय होते. ते ब्राह्मण समाज मंडळाच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य होते. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. निवृत्त मुख्याध्यापक विनोद गोखले यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. अँड. विवेक गोखले यांच्या आकस्मिक निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने नाधवडे परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी नाधवडे स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.













