सावंतवाडीत रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

ग्रामीण भागातील विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ : नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनीही केली गावठी भाज्यांची खरेदी 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात महिला व बालकल्याण समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय रानभाज्या व गावठी वस्तू महोत्सवाचा अत्यंत उत्साही वातावरणात शुभारंभ झाला. या महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष सौ. श्रद्धा सावंत-भोसले यांच्या शुभहस्ते पार पडले.

महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी स्थानिक नागरिकांनी विविध स्टॉल्सवर गर्दी करत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दोन दिवशीय प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांनी केले आहे.

पावसाळ्यात निसर्गात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या औषधी व पौष्टिक रानभाज्यांची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच त्यांच्या आरोग्यादायी गुणधर्मांबाबत समाजात व्यापक जनजागृती व्हावी, या मुख्य उद्देशाने दि. २५ आणि २६ ऑगस्ट रोजी या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटनानंतर नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी महोत्सवातील विविध स्टॉलला भेट देऊन विक्रेत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांनी रानभाज्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली, तसेच स्वतः गावठी भाज्यांची खरेदी करून स्थानिक विक्रेत्यांचा उत्साह वाढवला.

पावसाळ्याच्या दिवसांत कोकणातील डोंगराळ व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांना पारंपरिक आहारामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, बदलत्या आधुनिक जीवनशैलीमुळे नव्या पिढीला या नैसर्गिक खाद्यपदार्थांची आणि त्यांच्या औषधी मूल्यांची माहिती कमी होत चालली आहे. ही पारंपरिक संस्कृती जतन करण्याबरोबरच रानभाज्यांचे पौष्टिक व आरोग्यादायी महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाच्या माध्यमातून नगरपरिषदेने केला आहे.

या महोत्सवात विविध प्रकारच्या ताज्या रानभाज्यांसोबतच स्थानिक पातळीवर महिलांनी तयार केलेल्या विविध गावठी वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उत्पादने आणि रानभाज्यांची जास्तीत जास्त खरेदी करावी, असे आवाहन महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर तसेच सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिला व स्थानिक विक्रेत्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, नागरिकांनाही शुद्ध, नैसर्गिक व पारंपरिक आहाराची ओळख होत आहे.

या उद्घाटन प्रसंगी महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उपसभापती सुनीता पेडणेकर यांच्यासह नगरसेविका दुलारी रांगणेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आदी मान्यवर, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.