वैभववाडी प्रतिनिधी :
विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अविवाहित तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संदेश संतोष साटम (वय २६, रा. वैभववाडी बाजारपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
संदेश साटम याने सोमवारी दुपारी विषारी द्रव्य प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
संदेश साटम हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वैभववाडी येथील शासकीय विश्रामगृहात गेल्या वर्षभरापासून कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती मिळाली.
संदेश हा सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी संतोष साटम यांचा मुलगा होता. त्याच्या पश्चात वडील व भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे वैभववाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.













