वाढीव बिलांमुळे सावंतवाडीत महिला महावितरणवर संतापल्या

अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केल्याने वाद पेटला

​सावंतवाडी: वीज मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग उपलब्ध नसतानाही महावितरणने अवाजवी आणि फुगवलेली बिले पाठवल्याच्या विरोधात सावंतवाडी शहरातील महिला नागरिक अत्यंत आक्रमक झाल्या. संतप्त महिलांच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन जबाबदार अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र, नागरिकांच्या रास्त प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी अधिकाऱ्यांनी थेट ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावल्याने कार्यालयातील वातावरण अधिकच तापले. प्रश्न विचारले म्हणूनच प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे.

सावंतवाडी शहरातील अनेक ग्राहकांना महावितरणकडून कोणतीही अचूक रीडिंग न घेता भरमसाठ वाढीव वीजबिले पाठवण्यात आली असल्याचा आरोप ग्राहकांमधून केला जात आहे. या अवाजवी आकारणीमुळे हैराण झालेल्या काही महिलांनी मंगळवारी एकत्र येत महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. रीडिंग न घेता हे बिल कसे तयार केले, असा थेट सवाल महिलांनी केला. यावर सिस्टीममध्ये अचानक ‘एव्हरेज’ वाढल्यामुळे बिलाची रक्कम वाढून आल्याचे अजब समर्थन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले. यामुळे समाधान न झाल्याने महिलांनी अधिकाऱ्यांना प्रशासकीय गलथानपणाबद्दल चांगलेच सुनावले.

मात्र, ​आपली चूक मान्य करण्याऐवजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थेट पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधून पोलिसांना कार्यालयात पाचारण केले. न्याय मागण्यासाठी आलेल्या सामान्य महिलांना घाबरवण्यासाठी पोलिसांनी पाचारण करण्यात आल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला. जोपर्यंत अवाजवी बिलांची दुरुस्ती करून मिळत नाही आणि या प्रकरणाचा योग्य तो निकाल लागत नाही, तोपर्यंत आम्ही हे फुगवलेले बिल भरणार नाही, असा ठाम आणि आक्रमक इशारा सर्व महिलांनी प्रशासनाला दिला आहे.

​दरम्यान, या संपूर्ण वादावर महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी आपली बाजू मांडली असून तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रणालीतील सरासरीच्या (एव्हरेज) गणनेमुळे काही बिलांमध्ये तफावत आली असण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, नागरिकांशी संवाद साधण्याऐवजी थेट पोलिसांना मध्यस्थीसाठी बोलावल्याने महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात सावंतवाडीतील जनतेमधून मोठा रोष व्यक्त केला जात आहे.