आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेत केली चर्चा
बस स्थानकाचे काम मार्गी लागण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी
नव्या बसेससह बंगळुरू आंतरराज्य सेवेला परिवहन मंत्र्यांकडून हिरवा कंदील
सावंतवाडी: सावंतवाडी मतदारसंघातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत सावंतवाडी एसटी बस स्थानकाचे काम वेगाने सुरू करणे, गणेशोत्सवापूर्वी नव्या बसेस उपलब्ध करून देणे आणि सावंतवाडी-बेळगाव मार्गे बंगळुरू ही आंतरराज्य बस सेवा सुरू करणे या तीन प्रमुख मागण्यांवर त्यांनी भर दिला. परिवहन मंत्र्यांनी या सर्व विषयांवर सकारात्मक निर्णय घेत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
सावंतवाडी एसटी बस डेपोचे बांधकाम बीओटी तत्त्वावर मंजूर झाले आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या दिरंगाईमुळे हे काम रखडले आहे. बस स्थानकाचे बांधकाम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची तातडीची बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी आमदार केसरकर यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.
दरम्यान, चालू आठवड्यात सावंतवाडी आगाराला एसटीच्या पाच नवीन बसेस प्राप्त झाल्याबद्दल आमदार केसरकर यांनी परिवहन मंत्र्यांचे आभार मानले. त्याचवेळी मतदारसंघातील प्रवाशांची गरज लक्षात घेऊन उर्वरित १५ नवीन बसेस आगामी गणेशोत्सवापूर्वी तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली.
याशिवाय, सिंधुदुर्ग जिल्हा आणि सावंतवाडी परिसरातून शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त कर्नाटकातील बंगळुरू शहरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. थेट एसटी बस सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना सध्या बेळगाव किंवा गोव्यातील पणजी, मडगावमार्गे प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. सावंतवाडीवरून बेळगाव, धारवाड, हुबळी, हावेरी, दावणगेरे, चित्रदुर्ग आणि तुमकूर मार्गे बंगळुरूपर्यंत दैनंदिन आंतरराज्य बस सेवा सुरू केल्यास प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. याच मार्गावर आंबोली हे प्रमुख पर्यटन स्थळ येत असल्याने या बसला उत्तम प्रवासी भारमान (ऑक्युपन्सी) मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या तिन्ही मागण्यांवर परिवहन मंत्र्यांनी लवकरात लवकर योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.












