शिवार आंबेऱे ग्रामस्थांचा शैक्षणिक क्षेत्रात पुढाकार

लोकवर्गणीतून शाळांच्या विकासासाठी भरीव योगदान; विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा व दर्जेदार पुस्तके उपलब्ध

 रत्नागिरी :

मौजे शिवार आंबेऱे येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत गावातील शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला असून, लोकवर्गणीतून जमा झालेल्या भरीव निधीतून विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
गावातील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ च्या इमारतीची छप्पर दुरुस्ती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी नवीन बेंचेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, शाळेची रंगरंगोटी करून आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ साठी विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी पटांगणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
याचबरोबर श्रमिक विद्यालय, शिवार आंबेऱे येथील विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची कपाटे उपलब्ध करून देण्यात आली असून, विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची गोडी लागण्यास मदत होणार आहे.
ग्रामपंचायत शिवार आंबेऱेनेही जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बोअरवेलची व्यवस्था केली आहे.
या संपूर्ण शैक्षणिक उपक्रमासाठी शिवार आंबेऱे ग्रामविकास प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. या कार्यासाठी श्री. गोपाळ रोकडे, भालचंद्र पारकर, दिपक लाखण, दिवाकर कदम, राजन रोकडे, सुरेंद्र लाखण, नितीन हातिसकर, संजय मेस्त्री, सुनील कुळये जगदिश कदम यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली . शिवार आंबेऱे नमन मंडळानेही या उपक्रमासाठी आपले योगदान दिले.
गावाच्या विकासासाठी विविध सामाजिक क्षेत्रांत कार्यरत असतानाच शिवार आंबेऱे येथील नागरिकांनी शिक्षण क्षेत्राशी असलेली आपली बांधिलकीही जपली आहे. गावातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावावा, या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्रितपणे केलेला हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामस्थांच्या या शैक्षणिक बांधिलकीचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.