दादर, ठाणे येथे दोन एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास ५ सप्टेंबरपर्यंत मर्यादित

मुंबई : मुंबई सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ येथे सुरू असलेल्या वाहतूक व वीज कामामुळे मध्य रेल्वेने दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवासात बदल केला आहे. या गाड्यांचा मुंबई सीएसएमटीपर्यंतचा प्रवास तात्पुरता मर्यादित करून त्या अनुक्रमे दादर आणि ठाणे स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. ही व्यवस्था ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

 

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, २२१२० मडगाव जंक्शन–मुंबई सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस ही गाडी ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहे. त्यामुळे या कालावधीत ही गाडी मुंबई सीएसएमटी स्थानकापर्यंत जाणार नाही.

 

तसेच १२१३४ मंगळुरू जंक्शन–मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ही गाडीही ४ सप्टेंबर २०२६ पर्यंत ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहे. या गाडीचाही मुंबई सीएसएमटीपर्यंतचा प्रवास तात्पुरता मर्यादित करण्यात आला आहे.

 

मुंबई सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ येथे सुरू असलेल्या कामांमुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. या बदलामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे.