मसुरे | झुंजार पेडणेकर :गावच्या विकासात बांधकाम कामगारांचे हात जेव्हा स्वच्छतेची झाडू हातात घेतात, तेव्हा गावाचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो, याचा एक आदर्श आणि अनोखा वस्तुपाठ वडाचापाट गावाने घालून दिला आहे. ग्रामपंचायत वडाचापाट कार्यक्षेत्रातील सर्व पुरुष आणि महिला बांधकाम कामगारांनी एकत्र येत श्रमदानातून गावातील रस्ते साफसफाई करणे व रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली झाडी-झुडपे तोडण्याचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. बांधकाम मजुरांच्या या अनोख्या उपक्रमाची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
या श्रमदान उपक्रमात गावातील सर्व बांधकाम कामगार तसेच महिला वर्ग मिळून ५० ते ६० नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून गावच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले.
या उपक्रमावेळी सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. विनायक प्रभुदेसाई, सौ. सविता पालव, सौ. सोनल मांजरेकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्री. राजेंद्र प्रभुदेसाई, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. प्रथमेश पालव आणि युवा उद्योजक श्री. दयानंद विलास प्रभुदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
गावातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे युवा उद्योजक श्री. दयानंद विलास प्रभुदेसाई यांनी या उपक्रमासाठी लागणाऱ्या ‘ग्रासकटर’ मशिन्ससाठी पेट्रोल आणि सर्व श्रमजीवी नागरिकांसाठी नाश्त्याची उत्तम सोय केली. बांधकाम कामगारांचे हात आज गावच्या स्वच्छतेसाठी पुढे आले हा उपक्रम जिल्ह्यात एकमेवाद्वितीय ठरला आहे. याबद्दल सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई यांनी उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य व कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व बांधकाम कामगारांचे मनापासून विशेष आभार मानले.
बांधकाम मजुरांनी पुढाकार घेऊन केलेल्या या श्रमदानामुळे रस्ते चकाचक झाले असून हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.













