पालकमंत्री नाम. नितेश राणे यांना दिले पं. स. सदस्य देवानंद पालांडे यांनी निवेदन
वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात विविध पदे रिक्त असून, त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी पंचायत समिती सदस्य देवानंद बाळकृष्ण पालांडे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके उपस्थित होते.
निवेदनात वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ तसेच बधिरीकरण तज्ज्ञ (Anesthetist) ही प्रत्येकी एक पदे रिक्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याचे पालांडे यांनी म्हटले आहे.
ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.












