चौके-साळेल परिसरात गवा रेड्यांचा मुक्त संचार ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

तातडीने उपाययोजना करा : चौके माजी सरपंच राजा गावडे यांनी वेधले वनविभागाचे लक्ष

चौके | प्रतिनिधी : चौके, साळेल व परिसरातील गावांमध्ये गवा रेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, दिवसाढवळ्याही हे गवा रेडे रस्त्यालगत तसेच मानवी वस्तीजवळ मुक्तपणे संचार करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. असे सांगत चौके गावचे माजी सरपंच राजा गावडे यांनी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.

परिसरातील शेतांमध्येही गवा रेड्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांची नासधूस होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसणाऱ्या गवा रेड्यांचा वावर आता दिवसाही रस्त्यांवर आणि वस्तीजवळ दिसून येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

विशेषतः रस्त्यालगत गवा रेडे दिसून येत असल्याने वाहनचालकांमध्येही मोठी धास्ती निर्माण झाली आहे. अचानक गवा रेडे रस्त्यावर आल्यास वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वन विभागाने तातडीने याची दखल घेऊन आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जनतेच्या हिताच्या दृष्टीने नेहमीच आवाज उठवणारे चौके माजी सरपंच राजा गावडे यांनी परिसरात गवा रेड्यांचा सुरू असलेला मुक्त संचार वन विभागाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी यासंदर्भातील काही व्हिडिओही दाखवत परिस्थितीचे गांभीर्य वन विभागाच्या लक्षात आणून दिले आहे. गवा रेड्यांचा वाढता वावर, शेतपिकांचे होत असलेले नुकसान आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न लक्षात घेता वन विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.