सेवाव्रती ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या आठवणींना उजाळा
सावंतवाडी । प्रतिनिधी :
जेष्ठ बालरोगतज्ञ, सेवाव्रती आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर उर्फ अरुण भाई यांच्या दहाव्या दिवसानिमित्त कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगाव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात पार पडलेल्या या सभेला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टरांचे चाहते, कुटुंबीय आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमप्रारंभी वाचन मंदिराच्या कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. खानोलकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यभराच्या सेवाव्रती कार्याचा गौरव करण्यासाठी या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट करत उपस्थितांना आपल्या भावना व्यक्त करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी सावंतवाडीचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष गोवेकर, सेवानिवृत्त सिंधुदुर्ग जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, प्रसिद्ध लेखक-कवी प्रकाश तेंडुलकर, समाज कल्याण भूषण तथा वाचन मंदिराचे संचालक चंद्रकांत जाधव, ग्रंथालयाचे ग्रंथपाल, मळगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य आनंद देवळी आणि वाचन मंदिराचे अध्यक्ष महेश खानोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉक्टरांच्या आठवणींना उजाळा दिला.
मनोगत व्यक्त करताना प्रत्येक वक्त्याने डॉ. खानोलकर यांच्या मिश्किल बोलण्याच्या शैलीचा, वरकरणी कठोर वाटणाऱ्या पण आतून अत्यंत हळव्या स्वभावाचा आणि त्यांच्या परिपूर्ण वैद्यकीय चिकित्सा कौशल्याचा विशेष उल्लेख केला. केवळ व्यावसायिक डॉक्टर म्हणून नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्राला सेवाभाव मानून आयुष्यभर रुग्णसेवेलाच ईश्वरसेवा मानणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी समाजात आपला अमीट ठसा उमटवला. गोरगरीब रुग्णांच्या हाकेला नेहमी धावून जाणारे, पैशापेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारे आणि मळगाव-सावंतवाडी परिसरातील असंख्य बालकांना जीवनदान देणारे डॉक्टर म्हणून त्यांची कारकीर्द सदैव अविस्मरणीय राहील, अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांचा गौरव केला. सर्व मान्यवरांच्या श्रद्धांजलीपर मनोगतानंतर अत्यंत भावपूर्ण वातावरणात या श्रद्धांजली सभेची सांगता झाली.













