२ ऑक्टोबरपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत धरणे; कुडाळातील पत्रकार परिषदेत आंदोलनाची घोषणा
स्वप्निल कदम-कुडाळ :
सरकारी व अनुदानित शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच एकंदरीत शिक्षण व्यवस्थेवर नवीन शैक्षणिक धोरणामुळे होणारे परिणाम लक्षात घेता ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’ यांच्या वतीने राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात २ ऑक्टोबर २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलनाने करण्यात येणार असल्याची माहिती मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील मराठा मंडळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी
नवीन शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील शाळा-महाविद्यालये बंद होण्याचा धोका निर्माण झाला असून शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षणातील विषमता दूर करण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
२० पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे कारण देत शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, ‘गाव, तांडा, वाडी-वस्ती तिथे शाळा’ हे धोरण कायम ठेवावे आणि एक विद्यार्थी असला तरी शाळा सुरू ठेवावी, अशी ठाम मागणी मंचाने केली आहे. तसेच १५ मार्च २०२४ रोजीच्या संचमान्यता शासन निर्णयाचा पुनर्विचार करून प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
केजी ते पीजीपर्यंत मोफत व समान शिक्षणाची मागणी
नवीन शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण वाढून ग्रामीण, दलित, आदिवासी, बहुजन, कष्टकरी, भटके-विमुक्त व अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू शकते, असा दावा मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे, केजी ते पीजीपर्यंत सर्वांना मोफत, गुणवत्तापूर्ण व समान शिक्षण उपलब्ध करून द्यावे आणि शिक्षणावरील सरकारी खर्च राष्ट्रीय उत्पन्नाच्या दहा टक्क्यांपर्यंत वाढवावा, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
या मागण्यांसाठी राज्यभर जिल्हा व विभागवार परिषदा, सभा तसेच जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण संस्था, सामाजिक व स्वयंसेवी संघटना तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांनी या राज्यव्यापी आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला संपत देसाई, संजय वेतुरेकर, अंकुश कदम, सोमकांत परुळेकर (सावंतवाडी), प्रशांत आडेलकर (कुडाळ), सागर फाळके (देवगड), फीझा मकानदार (सावंतवाडी), गुणाजी गवस (दोडामार्ग), राजेंद्र कांबळी, महेश पेडणेकर (सावंतवाडी), संतोष तेंडोलकर (वेंगुर्ला) आदी उपस्थित होते. संपत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.













