डाक विभागाच्या जनजागृती उपक्रमाची माहिती; बचत, विमा, ई-बँकिंगसह विविध सेवा नागरिकांसाठी उपलब्ध
स्वप्निल कदम-कुडाळ :
भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या डाक विभागामार्फत नागरिकांना केवळ पत्रे व पार्सल वितरणाची सेवा न देता बचत, विमा, बँकिंग, आधार, डिजिटल सेवा तसेच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पार्सल आणि लॉजिस्टिक्सच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या सेवांबाबत जनजागृती करण्याबरोबरच अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या डाकघर खात्यांमधील जमा रक्कम खातेदार किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. अशी माहिती कुडाळ औद्योगिक समूह डाकघराचे पोस्टमास्तर विकास वर्मा यांनी दिली.
एमआयडीसी विश्रामगृह येथे बुधवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नितीन नेमळेकर, प्रकाश गावडे, संदीप कसपले, रविकांत मोर्ये, शुभम घिगे, गिरीश बोबलेकर आदी उपस्थित होते.
“तुमची बचत, तुमची सुरक्षा आणि तुमची सेवा” यासाठी डाक विभाग नेहमीच कार्यरत आहे. डाकघरांमध्ये अनेक अशी खाती आहेत, ज्यामध्ये दीर्घकाळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अनेक खातेदार अथवा त्यांच्या कुटुंबीयांना या खात्यांची माहिती नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची तसेच आपल्या कुटुंबातील जुनी बचत खाती, आरडी, टीडी, एमआयएस, एनएससी, केव्हीपी आदी खात्यांची जवळच्या डाकघरात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन वर्मा यांनी केले.
“तुमचे जुने खाते केवळ एक रेकॉर्ड नसून, तुमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीची बचत असू शकते,” असेही त्यांनी सांगितले.
डाकघरांमध्ये नागरिकांसाठी बचत खाते, आरडी, टीडी, एमआयएस, एससीएसएस, पीपीएफ, एनएससी, केव्हीपी, सुकन्या समृद्धी योजना आदी विविध अल्पबचत योजना उपलब्ध आहेत. या योजनांचे व्याजदर भारत सरकारकडून वेळोवेळी निश्चित केले जातात. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार योजनांची माहिती जवळच्या डाकघरातून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
डाक विभागाच्या पोस्टल लाइफ इन्शुरन्स व रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स योजनांद्वारे नागरिकांना जीवन विमा संरक्षणही उपलब्ध करून दिले जाते. विशेषतः ग्रामीण भागातील कुटुंबांपर्यंत विमा संरक्षण पोहोचविण्यात रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्सची महत्त्वाची भूमिका आहे.
डाक विभाग आता वैयक्तिक ग्राहकांसोबतच व्यापारी, एमएसएमई व ई-कॉमर्स व्यवसायांसाठीही महत्त्वाचा लॉजिस्टिक पार्टनर म्हणून कार्यरत आहे. डोमेस्टिक व इंटरनॅशनल पार्सल सेवांसोबतच व्यापारी ग्राहकांसाठी नियमानुसार बिझनेस अँग्रीमेंटची सुविधाही उपलब्ध आहे.
याशिवाय डाकघरांमध्ये आधार एनरोलमेंट व अपडेट, मोबाईल क्रमांक अपडेट, डिजिटल व वित्तीय सेवा तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बचत व वित्तीय सेवा, विमा, मेल, स्पीड पोस्ट, पार्सल व लॉजिस्टिक्स, व्यापार विकास, आधार सेवा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा ही डाक विभागाची प्रमुख सेवा क्षेत्रे आहेत.
नागरिकांनी आपल्या जुन्या डाकघर खात्यांची माहिती घेण्याबरोबरच आपल्या कुटुंबातील जुन्या खात्यांचीही तपासणी करावी आणि आपल्या बचतीकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन विकास वर्मा यांनी केले.












