सार्वजनिक बांधकाम विभागाला उपोषणाचा इशारा
सावंतवाडी:
सोनुर्ली येथून वेत्ये येथील एका वैयक्तिक क्रशरसाठी ११ केव्ही हायटेक वीज लाईन टाकण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या परवानगीविरोधात सोनुर्ली येथील ग्रामस्थ आणि शेतकरी अत्यंत आक्रमक झाले आहेत. या मनमानी कारभाराच्या आणि परवानगीच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सोनुर्ली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना हे लेखी निवेदन सादर केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्याच्या बाजूने ही ११ केव्ही हायटेक वीज लाईन वेत्ये येथील क्रशरसाठी नेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, सदर हायटेक वीज लाईन गावातून नेण्याला स्थानिक ग्रामस्थ, जमीन मालक शेतकरी आणि सोनुर्ली ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध आहे. यासंदर्भात सोनुर्ली ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ही वीज लाईन न टाकण्याबाबत एकमुखाने ठरावही मंजूर करण्यात आला होता. याशिवाय ग्रामपंचायतीने यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र पाठवून अशा प्रकारची कोणतीही परवानगी देण्यात येऊ नये, अशी स्पष्ट विनंती केली होती.
एवढा तीव्र विरोध आणि ग्रामसभेचा ठराव असतानाही, सार्वजनिक बांधकाम विभागाने सोनुर्ली ग्रामस्थ किंवा ग्रामपंचायत कार्यालयाला कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर मंजुरी दिली. या प्रकारामुळे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
संबंधित क्रशरसाठी दिलेली परवानगी पुढील आठ दिवसांत तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्याबाबतचे लेखी पत्र सोनुर्ली ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी या निवेदनातून दिला आहे.













