मोती तलावाकाठच्या बॅनरबाजीला निर्बंध ; आकारावरही मर्यादा
गणेशोत्सवाच्या काळात सावंतवाडी शहरात मोठे बदल; नगरपालिकेचे विशेष नियोजन सुरू

सावंतवाडी: प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नगरपालिकेने कडक पावले उचलली असून, ग्रामीण भागातून माटवी व पूजेचे साहित्य विकण्यासाठी येणाऱ्या विक्रेत्यांची सोय नव्या भाजी मंडईच्या इमारतीतील पार्किंगच्या भव्य जागेत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या मोती तलावाच्या परिसरात शुभेच्छांचे बॅनर लावण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, ठरवून दिलेल्या सात ठिकाणीच आठ बाय दहा आकाराचे बॅनर सात दिवसांच्या पूर्वपरवानगीने लावता येणार आहेत. नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या नियोजन बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. गणेशोत्सव काळात शहरात येणाऱ्या नागरिकांना योग्य सेवा देण्यासाठी आम्ही चांगले नियोजन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मा.नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी आयोजित केलेल्या विशेष बैठकीत सांगितले . गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुलभतेसाठी आणि सोयीसाठी मा.नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली यात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत .
*रेल्वेच्या वेळेत चाकरमान्यांसाठी जादा एस. टी बस*
यात मुख्य म्हणजे परिवहन महामंडळाकडे ३६ ते ४० जादा बस देण्याची मागणी करण्यात आली असून एस टी गाड्यांचा येण्याजाण्याचा मार्ग बाजारपेठेतून न ठेवता राजवाड्याकडील मार्गावरून करण्यात आला आहे . मुख्य शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे . याशिवाय गणेशचतुर्थी काळात दर दहा मिनिटांनी एस टी गाड्या सोडल्या जातील असे विभागातर्फे सांगण्यात आले आहे . याशिवाय कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेच्या वेळेनुसार गाड्यांचे नियोजन असल्याचे नमूद करण्यात आले आहे . तसेच सावंतवाडी एस टी स्टँडवर स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी दोन महिला पोलीस तैनात करण्याचे निवेदन देण्यात आले आहे .
*आता बाजारपेठ भरणार नवीन भाजी मंडईतील पार्किंग स्पेस मध्ये*
गणेशोत्सवादरम्यान सावंतवाडी बाजारपेठ अगदी गजबजलेली असते . अगदी स्थानिक व्यावसायिक गावठी वस्तू विकण्यासाठी बाजारपेठेत आणतात . तसेच चतुर्थीत लागणारे माटवी सामान विकण्यासाठी व्यावसायिक बाजारात येतात . याशिवाय डेकोरेशन सामान आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात ग्राहक खरेदी करतात याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळावे तसेच होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ही संपूर्ण बाजारपेठ आता गणेश चतुर्थी दरम्यानच्या काळात नवीन भाजी मंडईच्या इमारतीत करण्यात आलेल्या पार्किंग बेस मध्ये करण्यात येणार आहे .व्यापाऱ्यांचे योग्य विभागनिहाय वर्गीकरण करून जागा देण्यात येणार आहे . त्यासाठी लाइट आणि cctv कॅमेऱ्यांची सोय नगरपालिकेतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच बाजारपेठेत कोणतीही भेसळयुक्त वस्तू विकण्यात आल्यास त्या व्यावसायिकाची तक्रार FDA कडे करून त्याचे लायसन रद्द करण्यात येईल अशी सुचना देण्यात आली आहे
तसेच शहरातील विद्युत पुरवठा कायम राहणार याची काळजी घेण्यासाठी आम्ही योग्य नियोजन केले असल्याचे महावितरण विभागातर्फे सांगण्यात आले . PWD विभागातर्फे चतुर्थीच्या आधी रस्ते दुरुस्ती करून झाडी साफ करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे . खासकील वाडा आणि सालईवाडा येथील खड्डे लवकर बुजवले जातील याचे आश्वासन नगरपालिकेकडून देण्यात आले आहे . तसेच मोती तलावाकडील फुटपाथचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून ३० तारीख पर्यंत काम पूर्ण करण्याचे सांगितले आहे .तसेच गणेशोत्सवादरम्यान निर्माल्य मोती तलावात न टाकत त्या ठिकाणी ठेवलेल्या कचरपेटीत टाकावे अशी विनंती नगरपालिकेकडून करण्यात आली आहे यासाठी जादा कचरापेटी त्या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
*भव्य रील स्पर्धेचे आयोजन*
आनंदाची गोष्ट म्हणजे माझी वसुंधरा अभियानांतर्गत भव्य रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . या रील स्पर्धेचा विषय पर्यावरण पुरक गणेश सजावट असा आहे . या स्पर्धेत जास्तीत जास्त शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे . तसेच गणेशोत्सवादरम्यान लावण्यात येणाऱ्या अनधिकृत फलक लावणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांना गणेशचतुर्थी काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आमचा सर्वोतोपरी प्रयत्न असेल असे आश्वासन नगरपालिकेकडून देण्यात आले आहे .













