पीएमश्री लांजा नं. ,५ शाळेने राबविला ” एक पत्र, एक राखी, शूरवीर सैनिकांसाठी ” उपक्रम

कोल्हापूरमधील TA बटालियन येथे राख्या आणि पत्रे झाली पोहोच

संतोष कोत्रे
लांजा : आनंदादायी शनिवार या उपक्रमांतर्गत एक राखी, एक पत्र सैनिकांसाठी या विशेष उपक्रमांतर्गत पीएमश्री शाळा लांजा नं.५ या शाळेतील विद्यार्थ्यांनी ३२० तिरंगी राख्या व १०० पत्रे TA बटालियन कोल्हापूर येथील सैनिकांना
पाठवून आपले रक्षण करणाऱ्या शूरवीर सैनिकांप्रती देशभक्तीची भावना व्यक्त केल्या.
आपल्यासाठी सीमेवर अहोरात्र जागणाऱ्या, आपल्या भारतीय शूरवीर जवानांना सलाम करण्यासाठी तसेच देशप्रेम व देशभक्तीची भावना मुलांच्या मनात निर्माण होण्यासाठी लांजा नं.५ शाळेने हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत ३२० राख्या व १०० पत्रे TA बटालियन कोल्हापूर येथे सैनिकांना पाठविण्यात आली.गेल्या वर्षीपासून हा उपक्रम शाळा राबवित आहे. यावर्षी पाठविलेल्या राख्या व पत्रे पोहोच झाल्यावर TA बटालियन मधील हवालदार निवास जाधव यांनी फोटो पाठविले व शाळा राबवित असलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. विशेष म्हणजे TA बटालियन सैनिकांनी मुलांनी लिहिलेली सुंदर पत्रे स्टेटस ला लावून मुलांचे कौतुक केले. सैनिकांनी मुलांनी लिहिलेल्या पत्राचे स्टेटस लावलेले फोटो व्हायरल होत आहेत.
या सामाजिक उपक्रमासाठी लांजा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.सोनावले , विस्तारअधिकारी विनोद सावंग, केंद्रप्रमुख तिमसेकर ,पंचायत समिती सभापती व सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शा. व्य. समिती, सर्व पालक, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. मुलांच्या मध्ये देशभक्तीची भावना सदैव तेवत ठेवण्यासाठी तसेच “देश प्रथम, सैनिक सर्वोत्तम “ही भावना दृढ होण्यासाठी या पुढेही हा उपक्रम चालूच राहिल, असे शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ सुर्वे सर यांनी सांगितले.