आमदार निलेश राणेंच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण

शिवकालीन ऐतिहासिक परंपरा जपत मालवणात नारळी पौर्णिमेचा उत्साह

बंदर जेटी परिसरात उसळला जनसागर

अमित खोत | मालवण : शिवकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपत मालवणात नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्गवरून मानाचे श्रीफळ सागराला अर्पण होतं असताना मालवण बंदर जेटी येथे ही आमदार निलेश राणे आणि व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते मानाच्या श्रीफळाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मच्छिमार, व्यापारी, नागरिकांच्या उपस्थितीत विधिवत सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले.

यावेळी “देवा सागरेश्वरा, धंद्यात बरकत दे… यश दे… खवळलेल्या दर्याला शांत हो…” अशी मनोभावे प्रार्थना करत सागरेश्वराला साकडे घालण्यात आले. मच्छिमार बांधवांनीही पारंपरिक पद्धतीने सागराचे पूजन करून श्रीफळ अर्पण केले.

दुपारी बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात व्यापारी संघाच्या वतीने मानाचे श्रीफळ ठेवून मालवणच्या व्यापार-व्यवसायाची भरभराट आणि नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर व्यापारी संघाचे मानाचे श्रीफळ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते वाजतगाजत मिरवणुकीने श्री हनुमान मंदिरापासून बंदर जेटीपर्यंत नेण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक उत्साह आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मिरवणुकीला विशेष रंगत आली.

बंदर जेटीवर आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मच्छिमार, व्यापारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत सागराला श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी बंदर परिसरात मोठी गर्दी झाल्याने उत्सवाला ‘जनसागराचे’ स्वरूप प्राप्त झाले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सभापती प्रज्ञा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, तालुकाप्रमुख मंदार लुदबे, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळस्कर, उपजिल्हाप्रमुख निषय पालेकर, शहर संघटक राजू बिडये, अभय कदम यांच्यासह विविध पदाधिकारी, व्यापारी, मच्छिमार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालवणच्या समुद्राशी जोडलेली मच्छिमार आणि व्यापारी समाजाचे नाते तसेच शिवकालीन परंपरेचे स्मरण करून देणारा नारळी पौर्णिमेचा हा उत्सव यंदाही मोठ्या जल्लोषात पार पडला.