वरची पेठ शाळा क्रमांक २ परिसरातील धोकादायक विजवाहिन्या हटवा- शीतल पटेल यांची महावितरणकडे मागणी

राजापूर (प्रतिनिधी): राजापूर शहरातील वरची पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ समोरील वीजवाहिन्यांच्या धोकादायक स्थितीकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षा शीतल पटेल यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वरची पेठ शाळा क्रमांक २ समोरील इलेक्ट्रिक पोलवरील वीजतारांचे ताण चार ठिकाणी तुटले असून, तुटलेल्या तारांना जोड देण्यात आलेला आहे. या जुन्या झालेल्या वीजतारा गेल्या चार महिन्यांत दोन वेळा तुटून पडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील शालेय विद्यार्थी, नागरिक तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर रस्त्यावरून नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची कायम मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे वीजतारा तुटून पडल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन महावितरणने तातडीने जुन्या व जीर्ण झालेल्या वीजतारा बदलून त्यांना योग्य प्रकारे ताण देऊन सुरक्षित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे सध्या दोन इलेक्ट्रिक पोल रस्त्याच्या मध्यभागी आले आहेत. त्यामुळे हे पोल रस्त्याच्या कडेला किंवा योग्य सुरक्षित ठिकाणी मागे घेण्यात यावेत, अशी मागणीही सौ. पटेल यांनी केली याप्रसंगी भाजपा ओबीसी प्रदेश सचिव अनिल करंगुटकर, भाजपा शहर शहराध्यक्ष सुशांत मराठे, शीतल गोठणकर उपस्थित होते.