राजापुर तालुका काँग्रसच्या तालुका अध्यक्षपदी सतीश बंडबे यांची निवड

राजापूर, प्रतिनिधी: राजापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी शहरातील आंबेवाडी येथील रहिवाशी व तरूण कार्यकर्ते सतीश उर्फ लालू बंडबे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली बडंबे यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.
सतीश बंडबे हे काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी सातत्याने जोडलेले असून, पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांनी विविध स्तरांवर सक्रिय सहभाग घेतला आहे. कार्यकर्त्यांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण आणि संघटनात्मक कामाचा अनुभव या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर गावागावातील काँग्रेस संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, पक्षाची विचारधारा व भूमिका जनतेपर्यंत पोहोचविणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे आवाज उठविणे, ही प्रमुख आव्हाने बंडबे यांच्यासमोर असणार आहेत.
आगामी काळात तालुक्यात पक्षाचा जनसंपर्क वाढविण्यासोबतच बूथस्तरापासून संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. बंडबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात काँग्रेस पक्षाला नव्याने संघटनात्मक बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
सतीश बंडबे यांच्या निवडीबद्दल माजी आमदार व राजापूरच्या नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. जमिर खलिफे, शहर अध्यक्ष आजिम जैतापकर यांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.