मालवण पोलिसांचा अनोखा उपक्रम
विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना बांधली सुरक्षा राखी
महिला चालकांना गुलाबपुष्प देत हेल्मेट वापराबाबत जनजागृती
मालवण | प्रतिनिधी : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी ‘सुरक्षा राखी’ हा नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक उपक्रम मालवण शहरात उत्साहात राबविण्यात आला. देऊळवाडा येथील नाक्यावर झालेल्या या उपक्रमातून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित प्रवासाचे महत्त्व आपुलकीच्या माध्यमातून पटवून देण्यात आले.
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस ठाणे आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना रुजविण्यासाठी पोलिसांनी पारंपरिक राखीला सामाजिक संदेशाची जोड दिली.
देऊळवाडा नाक्यावर हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी व लोकप्रतिनिधींनी ‘सुरक्षा राखी’ बांधून सुरक्षित वाहनचालक होण्याचा संदेश दिला. तसेच दुचाकी चालविणाऱ्या महिलांना गुलाबपुष्प देत हेल्मेट वापराबाबत आपुलकीने जनजागृती करण्यात आली. पोलिसांच्या या वेगळ्या पद्धतीच्या उपक्रमाला वाहनचालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमात नगरसेविका नीना मुंबरकर यांनी महिला पोलीस भगिनींसह स्वतः सहभागी होत वाहनचालकांना सुरक्षा राखी बांधली. यावेळी त्यांनी नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
दुचाकीस्वारांनी हेल्मेट, तर चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट संदेशही यावेळी पोलिसांकडून देण्यात आला.
या जनजागृती मोहिमेत मालवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंडीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे, जितेंद्र पेडणेकर, सुरज रेडकर, सुप्रिया पवार, रंजू डोये, संकेत तांडेल, राजाराम तेरेखोलकर, शशिशेखर प्रभू, आरती खोबरेकर, सोनाली पाटकर, भक्ती शिवलकर, ज्योस्त्ना पोखरे, दीपक गावडे, धनंजय निवतकर, गणेश माने तसेच जिल्हा वाहतूक पोलीस कर्मचारी महेंद्र देऊलकर, मंचकराव शिरडे आणि नागेश मालवे आदी अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.













