वेतोरे वरचीवाडी येथील २२ वर्षीय युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

राज गोविंद नाईक असे त्याचे नाव

वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी येथील राज गोविंद नाईक या २२ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घराच्या हॉल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. उमलत्या वयात राज याने आपले जीवन का संपवले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे वेतोरे गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वेंगुर्ले पोलीस ठाण्यात राज याचे काका दत्ताराम भिवा नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुरुवार २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना समोर आली. आपण राहत असलेल्या घरा शेजारी माझा सख्खा लहान भाऊ गोविंद उर्फ दीपक भिवा नाईक हा त्याची पत्नी माधवी, मुलगा राज गोविंद नाईक यांच्यासह राहतो. माझा भाऊ गोविंद हा शेती करतो व त्याची पत्नी माधवी हि कणकवली कोर्टामध्ये नोकरीस आहे व पुतण्या राज हा मुळदे येथील हॉल्टीकल्चर कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता.

काल गुरुवारी सकाळी आपण नोकरीच्या ठिकाणी कुडाळ येथे गेलो होतो व माझ्या भावाची पत्नी माधवी हि नेहमी प्रमाणे कणकवली कोर्टात गेली होती व पुतण्या राज हा घरातच होता. सायंकाळी ४ वाजताच्या दरम्याने माझा भाऊ गुरांसाठी चारा आणण्याकरिता रानात गेला व तो सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्याने परत आला तेव्हा घराचा मुख्य दरवाजा बंद होता. त्यामुळे तो घराच्या पाठीमागील दरवाजाने घरात गेला.तेव्हा घराच्या हॉल मध्ये पुतण्या राज हा साडीच्या सहाय्याने गळफास लावून घेतलेल्या स्थितीत त्याला दिसून आला.

गळफास घेतलेल्या मुलाला पाहून वडिलांनी फोडला टाहो
आपल्या स्वतःच्या घरात एकुलत्या एक २२ वर्षीय मुलाने गळफास घेतले हे डोळ्यांनी पाहताच वडील दीपक नाईक यांनी टाहो फोडला. त्यांच्या ओरडण्याने शेजारचे लोक धावून गेले. त्यानंतर राज हा जिवंत असावा असे त्यांना वाटल्याने त्यांनी राज याला खाली उतरवले परंतु त्याची कोणतीही हालचाल दिसून न आल्याने तो मृत झाला याबाबत त्यांची खात्री झाली. त्यानंतर आपल्याला फोन करून सदर दुर्घटना कळवली. त्यानंतर मी घरी आलो तेव्हा माझा पुतण्या राज हा मृत अवस्थेत दिसून आला. या माहितीवरून वेंगुर्ले पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास वेंगुर्ले पोलीस करत आहेत. राज हा भाजपचे वेतोरे येथील निष्ठावंत कार्यकर्ते दीपक नाईक यांचा एकुलता एक मुलगा होता.