सावंतवाडी संस्थान मराठा समाज कुडाळतर्फे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा शुभारंभ

कुडाळ : प्रतिनिधी
सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई आणि मराठा समाज कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील मराठा समाज हॉल, गाळा क्रमांक २४ येथे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे. या अभ्यास केंद्राचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.

अभ्यास केंद्राच्या पहिल्या दिवशी शुभारंभ अकॅडमीचे संचालक सन्माननीय सूरज राय यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन आणि शासकीय सेवेत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींविषयी मार्गदर्शन केले.

या अभ्यास केंद्रामध्ये सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण वातावरण, बैठक व्यवस्था तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार एखादे पुस्तक उपलब्ध नसल्यास त्याची मागणी केल्यावर ते पुस्तक उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

तसेच विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शन मिळावे यासाठी आठवड्यातून किंवा महिन्यातून गरजेनुसार तज्ज्ञांचे गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात येणार आहेत. या केंद्राचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी येथे येऊन नियमितपणे सेल्फ स्टडी करावी आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपल्या समाजातील अधिकाधिक मुले शासकीय सेवेत दाखल व्हावीत, हा आहे.

“आपल्या मराठा समाजातील मुले स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय नोकरीत दिसावीत,” हा या उपक्रमामागील प्रामाणिक आणि सकारात्मक विचार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

अभ्यास केंद्राच्या शुभारंभप्रसंगी श्री. आर. एल. परब, श्री. गुरुनाथ धुरी, श्री. नंदकिशोर गावडे, श्री. स्वामी सावंत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पहिल्या दिवशी एकूण १० विद्यार्थी अभ्यासासाठी उपस्थित होते.

मराठा समाजातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अभ्यास केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.