देशभक्तीच्या रंगात रंगले देवगड; ‘वंदे मातरम्’ समूहगीत व नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शालेय विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मतेचा जागर

देवगड :
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि., देवगड यांच्या वतीने आयोजित ‘वंदे मातरम्’ समूहगीत गायन व नृत्य स्पर्धा २०२६ शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडली. या स्पर्धेला देवगड तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी आमदार अजित गोगटे होते.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत व नृत्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून देशप्रेम, राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कारांचे सुंदर दर्शन घडले. स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशप्रेम व सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.

समूहगीत गायन स्पर्धेत अनंत कृष्ण केळकर हायस्कूल, वाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला. श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल यांनी द्वितीय, तर शेठ म. ग. हायस्कूल, देवगड आणि एस. बी. राणे हायस्कूल, नारिंगे यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला.

नृत्य स्पर्धेत उमा मिलिंद पवार हायस्कूल, देवगड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच सर्वोत्कृष्ट शाळेचा मान श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल या शाळेला मिळाला.

समूहगीत गायन स्पर्धेचे परीक्षण दत्तात्रय किरकिरे सर, तर नृत्य स्पर्धेचे परीक्षण प्रिया लाड मॅडम यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना व शाळांना लोकमान्य सोसायटीच्या मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर, मयूर सर, देवगड शाखा व्यवस्थापक मंगेश तळवडेकर आणि प्रतीक वेसणेकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांचे उपस्थितांनी उत्स्फूर्त कौतुक केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी विद्यार्थी, शिक्षक, परीक्षक, शाळांचे प्रतिनिधी तसेच लोकमान्य सोसायटीच्या सर्व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याबद्दल आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.