डिजिटल शिक्षणाला बळ; शाळेच्या प्रशासकीय कामकाजासाठीही मोलाची मदत
स्वप्निल कदम- कुडाळ :
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा साळगाव नं. २ येथील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम आणि सुलभ व्हावे, या उद्देशाने शाळेचे माजी विद्यार्थी व पालकांनी पुढाकार घेत कॉम्प्युटर आणि ऑफिस टेबल अशी मौल्यवान भेट दिली. त्यांच्या या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी व पालकांकडून कौतुक होत आहे.
शाळेचे माजी विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त वर्ग-१ अधिकारी श्री. बबन गायचोर यांनी शाळेला कॉम्प्युटर भेट दिला. आजच्या डिजिटल युगातील शिक्षणाची गरज लक्षात घेऊन त्यांनी केलेले हे योगदान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजासाठी उपयुक्त ठरणार आहे.
तसेच शाळेचे माजी विद्यार्थी व पालक श्री. व सौ. सुवर्णा केशव माळकर यांनी शाळेला ऑफिस टेबल भेट दिले. शाळेच्या गरजा लक्षात घेऊन केलेल्या या सहकार्यामुळे कार्यालयीन कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.
माजी विद्यार्थी व पालकांनी शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते कायम ठेवत शाळेच्या विकासासाठी दिलेले हे योगदान कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर पडली असून, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी व पालक यांच्या वतीने श्री. बबन गायचोर तसेच श्री. व सौ. सुवर्णा केशव माळकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
“माजी विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या विकासासाठी दिलेले योगदान हे केवळ वस्तूंचे दान नसून, शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला विश्वास आणि आधार आहे,” असे गौरवोद्गार शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
शाळेच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भविष्यातही माजी विद्यार्थी व पालकांचे असेच सहकार्य मिळत राहावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.













