जेएनयूच्या प्रतिष्ठित कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मालवणच्या मातीतील हिंदी महानाट्य
शिवनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाला टाळ्या, घोषणांनी प्रेक्षागृह भारावले
तंजावरमध्ये महानाट्य आयोजित करण्याची राजे बाबाजी भोसले यांची घोषणा
सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक इतिहासातील ठरला अभिमानाचा क्षण
अमित खोत | मालवण :
“दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा!” या अभिमानाने दिल्लीच्या राजधानीत सिंधुदुर्गची शिवगर्जना दुमदुमली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि कवी भूषणांच्या ओजस्वी काव्याची गाथा सांगणाऱ्या ‘शिवराज भूषण’ या महानाट्याने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रतिष्ठित कन्व्हेन्शन सेंटरमध्ये इतिहासाचा थरार उभा केला. मालवणच्या शिवनिष्ठ कलाकारांनी सादर केलेल्या या महानाट्याच्या हिंदी प्रयोगाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. मालवणच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय राजधानीच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर मिळालेला हा सन्मान सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक इतिहासातील निश्चितच अभिमानाचा क्षण ठरला.
संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या आयोजनातून श्री शिवराज मंच, मालवण प्रस्तुत ‘शिवराज भूषण’चा प्रयोग २ सप्टेंबर २०२६ रोजी जेएनयूच्या भव्य कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाला.
२२ राज्यांतील इतिहास अभ्यासकांसमोर मालवणची कला
जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येणाऱ्या जेएनयूच्या भव्य परिसरात झालेल्या या प्रयोगाला दिल्लीतील लोकप्रिय राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी, जेएनयूच्या उपकुलगुरू प्रा. शांतिश्री पंडित, सिंधुदुर्गचे आमदार प्रमोद जठार यांच्यासह देशातील तब्बल २२ राज्यांतून आलेले इतिहास अभ्यासक व संशोधक उपस्थित होते.
याशिवाय जेएनयूचे विद्यार्थी, शिवशंभू विचार मंचाचे प्रतिनिधी तसेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कन्व्हेन्शन सेंटर प्रेक्षकांनी तुडुंब भरले होते.
हिंदी प्रयोगाचे आव्हान… अन् कलाकारांची ऐतिहासिक बाजी!
‘शिवराज भूषण’चे यापूर्वीचे तब्बल नऊ प्रयोग हाऊसफुल ठरले होते. मात्र दिल्लीतील प्रयोग हिंदी भाषेत असल्याने कलाकारांसमोर नवे आव्हान होते. मनात थोडे दडपण होते; पण प्रयोग सुरू होताच प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने कलाकारांचा आत्मविश्वास उंचावला.
महानाट्याच्या प्रत्येक प्रसंगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘नमः पार्वतीपते, हर हर महादेव’च्या घोषणांनी संपूर्ण कन्व्हेन्शन सेंटर अक्षरशः दुमदुमून गेले.
‘शिवराज्याभिषेक’ने सर्व भारावले
महानाट्याचा कळस ठरलेला ‘शिवराज्याभिषेक’ प्रसंग सादर होताच संपूर्ण वातावरण भारावून गेले. कवी भूषणांच्या ओजस्वी छंदांना ढोल-ताशांची साथ, रंगमंचावरील दिमाखदार सादरीकरण आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा थरार यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, तर घोषणांनी पुन्हा पुन्हा प्रेक्षागृह दणाणून गेले. कलाकारांसाठी हा क्षण केवळ यशाचा नव्हे, तर आपल्या भूमीच्या इतिहासाचा आणि शिवकार्याच्या संस्कारांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाल्याचा होता.
प्रयोग संपला; पण उत्साह थांबला नाही!
महानाट्य संपल्यानंतरही प्रेक्षकांचा उत्साह ओसरला नाही. तब्बल एक तास प्रेक्षक आणि इतिहास अभ्यासक रंगमंचावर येत कलाकारांचे कौतुक करीत होते. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि मिळालेली दाद कलाकारांसाठी अविस्मरणीय ठरली. याच वेळी एका प्रेक्षकाने खड्या आवाजात “दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा!” अशी घोषणा केली. या एका वाक्याने कलाकारांचा ऊर अभिमानाने भरून आला.
एकोजीराजे भोसले यांच्या वंशजांकडून कलाकारांचा गौरव
या ऐतिहासिक प्रयोगाला आणखी एक सुवर्णक्षण लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजीराजे भोसले यांचे थेट वंशज राजे बाबाजी भोसले हे ‘Life and Legacy of Chhatrapati Shivaji Maharaj’ या अखिल भारतीय परिषदेचे प्रमुख पाहुणे होते. राजे बाबाजी भोसले यांनी स्वतः रंगमंचावर येऊन कवी भूषणाची भूमिका साकारणारे महानाट्याचे निर्माते श्री. भुषण साटम यांचा शाल घालून सन्मान केला. याचवेळी त्यांनी तंजावर, तामिळनाडू येथे ‘शिवराज भूषण’चा प्रयोग आयोजित करण्याची घोषणा केली. मालवणच्या या कलाकृतीला मिळालेली ही दाद तिच्या राष्ट्रीय विस्ताराची नांदी मानली जात आहे.
सिंधुदुर्गच्या मातीतून दिल्लीच्या राजधानीपर्यंत… कलाकारांची दिल्लीतील निवास, भोजन आणि इतर व्यवस्था राजेशाही पद्धतीने करण्यात आली होती. मात्र या सर्वापेक्षा मोठा सन्मान होता तो किल्ले सिंधुदुर्गच्या मातीतून निर्माण झालेली शिवभक्ती आणि मालवणची सांस्कृतिक ओळख देशाच्या राजधानीत पोहोचण्याचा!
“दिल्लीतील राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर ‘शिवराज भूषण’ सादर होणे आमच्यासाठी स्वप्नवत होते. ही केवळ एका महानाट्याची गर्जना नव्हती; तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या राजधानीतून, किल्ले सिंधुदुर्गच्या मातीतून आलेल्या शिवनिष्ठ कलाकारांची भारताच्या राजधानीत झालेली ही ऐतिहासिक शिवगर्जना होती,” अशी भावना कलाकार संजय शिंदे, मालवण यांनी व्यक्त केली. मालवणच्या रंगभूमीचा राष्ट्रीय पटलावर झालेला हा दिमाखदार प्रवेश आणि ‘शिवराज भूषण’ला मिळालेली दिल्लीची दाद, सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे.
न भूतो न भविष्यती असे सादरीकरण : भुषण साटम
शिवराज भूषण या महानाट्याचा जवाहर लाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील प्रयोग हा न भूतो न भविष्यती असा सादर झाला.
भारताच्या तब्बल 22 राज्यांमधून आलेल्या इतिहासकारांनी, इतिहास संशोधकांनी तोंडभरन कौतुक तर केलंच पण अजून सहा राज्यांमधून म्हणजे छत्तीसगढ, मध्य प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुन्हा दिल्ली अश्या ठिकाणाहून पुढील प्रयोगा साठी वर्षाव झाला. तंजावर चे राजे बाबाजी भोसले यांनी तर तंजावर येथे या महा नाट्याच्या प्रयोगा साठी शिवराज भूषण टीम ला आमंत्रित केले आहे. सर्व कलाकारांनी जीव तोडून जी मेहनत केली त्यामुळे हे शक्य झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आशीर्वाद आहे. अश्या भावना शिवराज भूषण महानाट्याचे निर्माते श्री भूषण साटम यांनी व्यक्त केल्या आहेत.













