सिंधुदुर्गाचा आपुलकीचा आणि कर्तृत्ववान चेहरा हरपला ; जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरोज परब यांचे निधन

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा मसूरे गावच्या सुकन्या सौ. सरोज शिवाजी परब (वय ६६) यांचे शनिवारी रात्री हृदय विकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मसुरेसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. एक स्नेहशील, संवेदनशील आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. सिंधुदुर्गच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी तसेच मालवण तालुका खरेदी विक्री संघ सदस्य म्हणून त्या कार्यरत होत्या. आज रविवारी (30 ऑगस्ट ) दुपारी एक वाजता मसूरे मर्डेवाडी येथील घरून अंत्ययात्रा निघणार आहे.

सरोज परब यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, कर्तृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा होता. टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य करून त्या सेवानिवृत झाल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देतानाच समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड कायम राहिली. शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात केला. मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत पोहोचला. दोन वेळाने त्या जि प सदस्य म्हणून कार्यरत होत्या. एका सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्ह्याच्या सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंतची त्यांची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.

राजकारणात केवळ पदासाठी नव्हे, तर विचार, नाती आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सरोज परब यांची ओळख होती. आपल्या स्पष्टवक्तेपणासोबतच सृजनशील विचारसरणी आणि माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले.

सरोज परब या राणे कुटुंबाच्या कट्टर समर्थक आणि विश्वासू सहकारी म्हणून परिचित होत्या. राणे कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय परिस्थिती बदलत असताना सुद्धा त्यानी आपली निष्ठा आणि आपलीप्रामाणिकता

कधीही सोडली नाहीत राजकीय प्रवासात राणे कुटुंबाशी असलेले त्यांचे नाते कायम विशेष राहिले. सिंधुदुर्गच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राने आपले एक आपुलकीचे, सृजनशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. सेवानिवृत्ती नंतर सुद्धा त्या विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थाशी जोडलेल्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ, बहिणी, दीर, भावजयी, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे.

मालवण नगरपालिकेच्या शिवसेना नगरसेविका तथा आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण आणि मसुरे माजी उपसरपंच राहुल परब यांच्या मातोश्री तर सेवानिवृत्त एसटी वाहतूक नियंत्रक समाजसेवक शिवाजी परब यांच्या पत्नी होत.