गणेशोत्सवासाठी एसटी बसस्थानके सज्ज

स्वच्छतेवर विशेष भर

अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने बसस्थानकांची स्वच्छता

बसेसही चकाचक करण्याचे काम सुरू

कणकवली : कोकणातील सर्वात मोठ्या आणि उत्साहाच्या सणांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके सज्ज होत आहेत.

 

परिवहन मंत्री यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांमधील स्वच्छता व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. अत्याधुनिक स्वच्छता यंत्रसामग्रीचा वापर करून बसस्थानके अधिक स्वच्छ व आकर्षक करण्याचे काम सुरू आहे.

 

बसस्थानक परिसरातील दैनंदिन स्वच्छता, ओल्या व कोरड्या पद्धतीने साफसफाई, शौचालयांची नियमित स्वच्छता, प्लॅटफॉर्म परिसराची देखभाल तसेच प्रवाशांच्या प्रतीक्षालयांची स्वच्छता यावर विशेष भर देण्यात येत आहे.

 

गणेशोत्सवाच्या काळात बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने स्वच्छतेबरोबरच परिसराची नियमित देखभाल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर एसटी बसेसचीही नियमित स्वच्छता करण्यात येत असून, प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना स्वच्छ आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.