देवरूख पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये १७ शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

देवरूख (प्रतिनिधी):

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमधील शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या १७ विद्यार्थ्यांना प्रशालेच्यावतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, सुधीर गावडे, प्रशालेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेडगे, मुख्याध्यापिका सोनाली नारकर व दीक्षा खंडागळे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात इ. ४थी मधील स्मित गोवरे याने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आणि इयत्ता ७वी मधील आयुष चव्हाण याने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आणि जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत शाळेच्या नावलौकिक वाढवला. त्याचबरोबर इ. ४थी मधील विद्यार्थी नीरज मांगले व आराध्या कुलकर्णी यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. इ. ८वी मधील शाल्मली वाघमारे, रिद्धी अडूरे, समृद्धी सरवदे, प्रशिक मोहिते, नभा मांगले, स्मित जागुष्टे आणि इ. ५वी मधील धैर्यशिल पाटील, रुही गांधी, तनय थरवळ, अरफिन वागळे, रय्यान शिरगावकर, शुभ्रा कापडी, आरोही पोकळे या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रशालेतील १७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करून अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. या विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची असल्याचे उपस्थितांनी नमूद करून मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे याप्रसंगी कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली असून, भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशीच उल्लेखनीय कामगिरी करावी, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.