चिपळूण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा नांदिवसे नं. १ शाळेमध्ये एक राखी जवानांसाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे नांदिवसे या गावाला स्वातंत्र्य सेनानीची परंपरा लाभलेली आहे. सुभेदार अनंतराव शिंदे यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये सहा महिने पाकिस्तानमध्ये काढले होते. असे अनेक स्वातंत्र्य सेनानी गावामध्ये आहेत. नांदिवसे गावची ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन दरवर्षी शाळेतील उपक्रमशील शिक्षक संतोष दत्ताराम जाधव हे एक राखी जवानांसाठी हा उपक्रम घेत आहेत.
यावर्षी शाळेतील विद्यार्थिनींनी शंभर राख्या जवानांसाठी पाठविल्या आहेत. या राख्या कर्नल व्ही. के. पाटील कमांडिंग ऑफिसर, ६ मराठा लाईट इन्फंट्री A/O 56 APO PIN-911606 या पत्त्यावर पाठविण्यात आल्या आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी ये मेरे वतन के लोगो, हम सब भारतीय है जगी घुमवा रे दुमदुम वारे ही गाणी गायली. भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, इन्कलाब जिंदाबाद यांसारख्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा देण्यासाठी हा उपक्रम अतिशय मोलाचा आहे. या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक रवींद्र आदवडे व दीपक खाडे यांनी सहकार्य केले. या विद्यार्थ्यांचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैष्णवी जोशी, उपाध्यक्ष श्रावणी देवरुखकर, तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी दादासाहेब इरनक, विस्तार अधिकारी सौरवी जाधव, केंद्र समन्वयक प्रदीप राठोड यांनी अभिनंदन केले आहे.












