चिपळूण (वार्ताहर) : जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या पोलीस प्रशासनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्या वतीने अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना समाजसेवक विनेश भाऊ मोहिते म्हणाले, पोलीस आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील सामाजिक सलोखा अधिक दृढ व्हावा, हा या सत्कारामागचा मुख्य उद्देश आहे. कायदा व सुव्यवस्था राखतानाच पोलीस प्रशासन नेहमी सामाजिक कार्यात सहकार्य करत असते, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या कार्यक्रमास माजी सैनिक संभाजी चव्हाण, सुनील खरात, राहुल कदम, साहिल तांबे, सौरभ मोहिते, दैवता मोहिते, सुचिता तांबे, जयश्री जाधव, सुहानी मोहिते तसेच अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सचिन पवार सर यांनी केले, तर छायाचित्र जबाबदारी आकाश मोहिते यांनी सांभाळली.













