जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘ मुक मोर्चाने ‘ धडकणार ग्रामपंचायत अधिकारी

चिपळूण (प्रतिनिधी) : जळगांव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत वादंग झाल्याने ग्रामपंचायत अधिकारी पी.एन.पाटील यांचा ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. यामुळे ग्रामसभेची संख्या कमी करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभांवर बहिष्कार टाकला आहे. संघटनेच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी उद्या मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चाने धडक देणार आहेत.
गेल्या काही वर्षात ग्रामपंचायतीत होणाऱ्या ग्रामसभांची संख्या वाढली आहे. राज्यातील विविध भागात ग्रामसभांमध्ये मोठ्या प्रमाणात वादंग होत आहेत. विविध शासकीय योजना व शासन निर्णयासाठी शासनाकडून ग्रामसभा घेणे बंधनकारक केले जात आहे. त्यामुळे ग्रामसभेची संख्या कमी करून सुरक्षेसाठी आवश्यक त्यात कायदेशीर व प्रशासकीय सुधारणा करण्याची मागणी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने केली आहे.
ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार वर्षातून चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. मात्र सध्या वर्षातून आठ ते दहा वेळा ग्रामसभा घ्यावा लागतात. सध्या डीजीटल प्रणालीमुळे शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती तत्काळ नागरिकांपर्यत पोहोचते. त्यामुळे अधिनियमात बदल करून वर्षातून एकदाच ग्रामसभा घेण्याची मागणी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने केली आहे.
ग्रामसभा बैठकी दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी व संबंधीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यकतेनुसार विनामुल्य पोलिस संरक्षण कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात यावे. ग्रामसभेचे ग्रामपंचायती मार्फत अधिकृत व्हिडीओ चित्रीकरण केले जात असल्याने अन्य व्यक्तींना छायाचित्रण करण्यास बंदी करावी. यामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदनामी करणे बाबत स्पष्ट कायदेशीर तरतूद करावी.
ग्रामविकास विभागा व्यतिरीक्त इतर विभागांच्या योजना, अभियान अथवा कार्यक्रमास ग्रामसभेची आवश्यकता असल्यास संबंधीत विभागाच्या कर्मचाऱ्यांवर ग्रामसभा आयोजन व प्रशासकीय जबाबदारी देण्याची तरतुद करावी, वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थी निवड ग्रामसभे मार्फत करण्याएैवजी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मागवून पंचायत समिती स्तरावर छाननी करून निवड करावी. या विविध मागण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे. मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता.१) जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे. या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.