खडपोली पुलाचे काम वेगाने; जानेवारीपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला होण्याचा विश्वास

पावसाळ्यापूर्वी सहा पिअर, दोन अॅबटमेंट व १२ गर्डर लाँचिंग पूर्ण
 आता डेक स्लॅब व जोडरस्त्यांचे काम सुरू
चिपळूण (प्रतिनिधी) : खडपोली येथील बहुप्रतीक्षित पुलाच्या बांधकामाने आता महत्त्वाचा टप्पा गाठला असून, जानेवारीपर्यंत पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वीच पुलाच्या फाउंडेशन व सबस्ट्रक्चरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आल्याने सध्या पावसामुळे काहीसा व्यत्यय येत असला, तरी पुलाच्या उर्वरित कामाला टप्प्याटप्प्याने गती देण्यात येत आहे.
पुलाच्या नदीपात्रातील सहा पिअर आणि दोन्ही अॅबटमेंटचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच नदीतील तीन स्पॅनसाठी १२ गर्डरचे लाँचिंगही पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पुलाच्या फाउंडेशनच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असलेला अत्यंत महत्त्वाचा टप्पा वेळेत पार करण्यात यश आले आहे. परिणामी पुलाच्या संपूर्ण सबस्ट्रक्चरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. तीन स्पॅनवर डेक स्लॅबचे काम सुरू १२ गर्डर लाँचिंगनंतर आता नदीतील तीनही स्पॅनवर डेक स्लॅबचे काम प्रगतिपथावर आहे. त्याचबरोबर पुलाच्या दोन्ही बाजूंच्या अॅप्रोच रोडचे कामही सुरू आहे. पुलाचे मुख्य बांधकाम आणि जोडरस्ते अशी दोन्ही कामे समांतरपणे सुरू असल्याने प्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर पुलाच्या बांधकामात Prestressing सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. पुलाची मजबुती आणि दीर्घकालीन टिकाऊपणा लक्षात घेऊन कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात आहे. उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त करण्याच्या उद्देशाने घाई न करता टप्प्याटप्प्याने काम सुरू ठेवण्यात आले आहे. पावसामुळे सध्या कामात व्यत्यय सध्या पावसाळा सुरू असल्याने नदीला पाणी असल्यामुळे नदीपात्रातील कामांना काही प्रमाणात व्यत्यय येत आहे. पाण्याची पातळी आणि प्रवाह लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करावे लागत आहे. मात्र पावसाळ्यानंतर परिस्थिती अनुकूल होताच उर्वरित कामांना आणखी वेग देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
जानेवारीची डेडलाईन पावसाळ्यापूर्वीच पुलाच्या फाउंडेशन व सबस्ट्रक्चरशी संबंधित महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने पुढील बांधकामाचा मार्ग सुकर झाला आहे. सध्या डेक स्लॅब आणि अॅप्रोच रोडचे काम सुरू असून, उर्वरित कामे नियोजनानुसार पूर्ण करण्यावर भर आहे. गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी तडजोड न करता जानेवारीपर्यंत खडपोली पूल पूर्णतः वाहतुकीसाठी खुला करण्याचा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या पुलाच्या पूर्णत्वाकडे आता खडपोली परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.