भाजपा जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांचे गुहागर पोलिसांना निवेदन
गुहागर प्रतिनिधी:
आमदार भास्कर जाधव यांच्या म्हणण्यानुसार, गुहागर तालुक्यात चालू असणारे आकड्याचे, मटक्याचे, जुगाराचे व दारूचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन भाजपा जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी गुहागर पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण यांना दिले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, नुकताच गुहागर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फिरत आहे. या व्हिडिओमध्ये गुहागर तालुक्यामध्ये विशेष करून शृंगारतळी या विकसित बाजारपेठेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांचे मटक्याचे, आकड्याचे, जुगाराचे व दारूचे धंदे आहेत असे त्यांनी जाहीरपणे व्यक्त केले आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या या वक्तव्याचा मी भाजपाचा जिल्हा सरचिटणीस म्हणून निषेध व्यक्त करत आहे. त्यामुळे शृंगारतळी बाजारपेठेतच नव्हे तर संपूर्ण गुहागर तालुक्यात आमदारांच्या म्हणण्याप्रमाणे चालू असणाऱ्या मटका, आकडा, जुगार व दारू धंद्यावरती तातडीने कारवाई करून या अवैद्य धंद्याचा समूळ नायनाट करावा. आपण या सर्व धंद्यावर केलेली कारवाई प्रतिदिनी नाव गावांसह जाहीर करावी. यामुळे व्यसनाधीनतेची तरुणाईला लागलेली कीड, लोकांचे उध्वस्त होणारे कुटुंब यावरती आळा बसणार आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे.












