अनिरुद्ध शेखर निकम यांची जिनिव्हातील ‘Youth Empowerment Forum 2026’ साठी निवड

संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर युवा सक्षमीकरण, शाश्वत विकास आणि जागतिक धोरणांवर संवाद साधण्याची संधी
चिपळूण (प्रतिनिधी) : सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध शेखर निकम यांची जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या ‘Youth Empowerment Forum 2026’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय युवा मंचासाठी निवड झाली आहे. दि. ३ ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या फोरममध्ये जगभरातील सुमारे १०० युवा प्रतिनिधी सहभागी होणार असून, युवा नेतृत्व, जागतिक धोरणे, शाश्वत विकास आणि मानवतावादी राजनय या महत्त्वपूर्ण विषयांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारमंथन होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे आयोजन United Nations आणि Center for Global Dialogue & Leadership यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे अनिरुद्ध निकम यांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विविध देशांतील युवा प्रतिनिधी, तज्ज्ञ आणि धोरणनिर्मितीशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधण्याची तसेच जागतिक प्रश्नांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी या फोरमच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे. संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय संस्थांना भेटी फोरमच्या कालावधीत United Nations Headquarters, Geneva, World Trade Organization (WTO) आणि International Labour Organization (ILO) या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांना अभ्यासभेटी देण्यात येणार आहेत. या भेटींमध्ये संस्थात्मक कामकाजाची माहिती, विशेष ब्रीफिंग, धोरणात्मक विषयांवरील चर्चा तसेच संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय Leadership and Skill Building आणि Humanitarian Diplomacy यांसारख्या विषयांवर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. युवा नेतृत्व विकसित करणे, आंतरराष्ट्रीय प्रश्न समजून घेणे आणि विविध देशांतील प्रतिनिधींमध्ये सहकार्याची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. शाश्वत विकासाच्या दिशेने युवा नेतृत्व फोरममधील UN Sustainable Development Goals Grant Pitch Competition हे विशेष आकर्षण ठरणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या Sustainable Development Goals (SDGs) शी संबंधित कल्पना, प्रकल्प आणि उपक्रम मांडण्याची संधी या स्पर्धेत सहभागी युवांना मिळणार आहे. या माध्यमातून Youth Empowerment, Global Policy, Sustainable Development, Labour Policy आणि International Trade Policy यांसारख्या व्यापक विषयांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे या फोरममधील सहभाग हा केवळ एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील उपस्थिती न राहता युवा नेतृत्व आणि जागतिक धोरणनिर्मिती समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अनुभव ठरणार आहे.
मराठी माध्यमातून शिक्षण ते ऑस्ट्रेलियातील उच्च शिक्षण अनिरुद्ध निकम यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात सह्याद्रि शिक्षण संस्थेतून झाली. त्यांनी मराठी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सह्याद्रि कृषी महाविद्यालयातून कृषी विषयातील पदवी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील University of Queensland येथे प्रवेश घेतला. जागतिक स्तरावरील नामांकित विद्यापीठांपैकी एक असलेल्या या विद्यापीठातून त्यांनी २०२२ ते २०२४ या कालावधीत M.Sc. Agriculture ही पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. विशेष म्हणजे, मराठी माध्यमातून शिक्षण घेत कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या अनिरुद्ध निकम यांनी शिक्षणासोबतच संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात कृषी संशोधन क्षेत्रात योगदान ऑस्ट्रेलियातील Queensland Department of Agriculture and Fisheries (QDAF) सोबत त्यांनी कृषी संशोधन क्षेत्रात काम केले आहे. Tropical Fruit Robustness and Post-Harvest Management या ऑस्ट्रेलियन सरकारच्या प्रकल्पाशी संबंधित संशोधनात त्यांनी योगदान दिले. कृषी उत्पादनांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांशी संबंधित संशोधनाचा अनुभव त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला आंतरराष्ट्रीय परिमाण देणारा ठरला आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील कामाची दखल घेत Queensland Government आणि University of Queensland यांच्या वतीने त्यांना डिसेंबर २०२४ मध्ये ‘Dean’s Commendation Award’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबत संशोधनातील योगदानाची ही महत्त्वपूर्ण दखल मानली जाते. क्रीडा, सामाजिक आणि संस्थात्मक क्षेत्रातही सक्रिय अनिरुद्ध निकम यांचा सहभाग केवळ शिक्षण आणि संशोधनापुरता मर्यादित नसून क्रीडा, सामाजिक कार्य, ग्रामीण विकास आणि युवा उपक्रमांमध्येही ते सक्रिय आहेत. ते चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. युवा वर्गाला शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राशी जोडण्याबरोबरच ग्रामीण भागातील विकासाच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग राहिला आहे.
सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना शिक्षण क्षेत्रातील संस्थात्मक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. स्थानिक शिक्षणापासून जागतिक व्यासपीठापर्यंतचा प्रवास अनिरुद्ध निकम यांचा प्रवास हा मराठी माध्यमातील शिक्षण, कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षण, ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे पदव्युत्तर शिक्षण, कृषी संशोधन, क्रीडा आणि संस्थात्मक नेतृत्व अशा विविध टप्प्यांतून घडलेला आहे. याच शैक्षणिक, संशोधनात्मक आणि नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर त्यांची जिनिव्हातील Youth Empowerment Forum 2026 साठी झालेली निवड विशेष उल्लेखनीय ठरते. स्थानिक पातळीवर शिक्षण घेतलेला युवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचून जागतिक प्रश्नांवर संवाद साधत असल्याने हा प्रवास कोकणातील तसेच महाराष्ट्रातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. जागतिक पातळीवरील विविध संस्था, तज्ज्ञ आणि युवा प्रतिनिधींशी संवाद साधताना मिळणारा अनुभव भविष्यातील त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संस्थात्मक कार्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. युवा नेतृत्वाला जागतिक दृष्टी देण्याच्या दिशेने अनिरुद्ध निकम यांचा जिनिव्हातील सहभाग हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.