गणेशोत्सवापूर्वी १५ नव्या बसेस उपलब्ध होणार : परिवहन मंत्र्यांची ग्वाही

सावंतवाडी मतदारसंघातीलएसटीच्या विविध प्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

​मुंबई : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत मंत्रालयात परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यातील एसटी महामंडळाशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

​बैठकीच्या सुरुवातीला सावंतवाडी एसटी स्थानकाच्या पुनर्विकास आराखड्याचे सादरीकरण परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. या आराखड्यात काही आवश्यक बदल करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, सुधारित आराखड्याचे पुन्हा सादरीकरण पुढील चार दिवसांत करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी दिले आहेत.

याशिवाय सावंतवाडी मतदारसंघासाठी मंजूर झालेल्या ३० बसेसपैकी पाच बसेस सावंतवाडी आगाराला प्राप्त झाल्या असून उर्वरित बसेस गणेशोत्सवापूर्वी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आमदार श्री. दीपक केसरकर यांनी केली. यावर सकारात्मक निर्णय घेत परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी गणेशोत्सवापूर्वी १५ बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

यामध्ये सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यांना प्रत्येकी पाच बसेस मिळणार आहेत.
​मतदारसंघातील दुर्गम व डोंगराळ गावे, अरुंद रस्ते आणि बस वळवण्यासाठी असणारी अपुरी जागा या पार्श्वभूमीवर कमी भारमानामुळे बंद पडलेल्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यासाठी मिनी बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार केसरकर यांनी केली.

ही मागणी तत्त्वतः मंजूर करत तिन्ही डेपोंसाठी लवकरात लवकर मिनी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. तसेच वेंगुर्ले आगारातील सीएनजी बसना सध्या चार किलोमीटर अंतरावरील खाजगी पंपावर जावे लागत असल्याने वेळ, श्रम आणि इंधनाचा अपव्यय होत आहे. डेपोमध्ये मंजूर असलेले एमएनजीएलचे सीएनजी युनिट तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

​इतर महत्त्वाच्या निर्णयांमध्ये वेंगुर्ले ते बोरिवली ही बंद असलेली एसटी बस फेरी पूर्ववत सुरू करण्याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. यासोबतच एसटी महामंडळातील कर्मचारी आरटीओकडे प्रतिनियुक्तीवर असल्यामुळे उद्भवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टंचाईवर चर्चा झाली. आरटीओ विभागात लवकरच नवी भरती होणार असून त्यानंतर हे सर्व कर्मचारी पुन्हा एसटी महामंडळाच्या मूळ सेवेत कार्यरत होतील, अशी माहिती मंत्री महोदयांनी दिली.

या बैठकीला राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक (बांधकाम) श्री. दिनेश महाजन, मुंबई प्रदेशाचे कार्यकारी अभियंता (बांधकाम), सिंधुदुर्गचे विभाग नियंत्रक श्री. घोडे, आर्किटेक्ट श्री. हुजेफर भोल आणि सुरज शेट्टी यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.