संशयित शुभम देशमुखच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील नागरिकांना कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून ‘प्रोसेसिंग फी’ तसेच इतर खर्चाच्या नावाखाली तब्बल ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संशयित आरोपी शुभम कृष्णकांत देशमुख (रा. कळंबा, कोल्हापूर) याचा जामीन अर्ज मालवण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. फकीह यांनी नामंजूर केला आहे. दरम्यान, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची पुन्हा १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
या प्रकरणात फिर्यादीच्या बाजूने ॲड. कौस्तुभ मराठे, ॲड. प्राजक्ता शिंदे आणि ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला.
फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत मालवण शहरातील नागरिकांना सिबील स्कोअर न तपासता कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानंतर ‘प्रोसेसिंग फी’ आणि इतर खर्चाच्या नावाखाली धुरीवाडा, मालवण येथील रहिवासी भारती घारकर यांच्यासह अनेक गरजू नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, संबंधितांना प्रत्यक्षात कर्ज न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी भारती घारकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४) आणि ३(५) अंतर्गत मुख्य आरोपी शुभम देशमुख याच्यासह महमुना शेख, प्रियांका खबडे, राहुल खाबडे, उमेश कांबळे, सुरेखा पाटील, आनंद माने, सचिन साबळे, सुरेश पाटील, महेश शिंदे आणि रेणुका वड या दहा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी शुभम देशमुख याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला होता. त्यानंतर देशमुख याने मालवण न्यायालयासमोर हजार केले गेले. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला एकूण १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
न्यायालयीन कोठडीत असताना शुभम देशमुख याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, मालवण न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची पुन्हा १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
या संपूर्ण आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे.












