रत्नागिरीत पोलिसांची धाडसी कारवाई: गोवंश कत्तल प्रकरणी मुंबईच्या दोघांना अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी : प्रतिनिधी

तालुक्यातील फणसवळे-वेतोशी गावच्या वेशीवरील जंगलात बुधवारी मध्यरात्री बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. गस्तीदरम्यान ही माहिती मिळताच कारवाईसाठी गेलेल्या ग्रामीण पोलिसांशी संशयितांनी हुज्जत घालत हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या धाडीत ३ गोवंशीय जनावरे, एक इनोव्हा कार, जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारी इंजेक्शने आणि धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. गुरुवारी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन बाबू कुरेशी (वय ३०, रा. मुंबई पूर्व) आणि शहेनशहा अब्दुल सत्तार शेख (वय ४८, रा. माहिम, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. तर अस्लम कुरेशी (रा. वांद्रे-कुर्ला, मुंबई) व देवा (रा. विरार) हे दोघे फरार आहेत.

याआधी जून महिन्यात फणसवळे येथे असाच गोवंश कत्तलीचा प्रकार समोर आला होता. तेव्हापासून ग्रामीण पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे आणि त्यांचे पथक या परिसरावर लक्ष ठेवून होते. बुधवारी रात्री पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक अभय तेली, पोलीस हवालदार संकेत महाडिक, सागर साळवी आणि चालक तेरवणकर हे पथक वाहनाचे दिवे बंद करून रात्रीच्या वेळी गस्त घालत होते.

गस्तीदरम्यान पोलिसांना एक गोवंशीय जनावर कापलेल्या अवस्थेत तर दोन जनावरे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तसेच जवळच झाडीत एक इनोव्हा कार उभी असल्याचे दिसले. कोणीतरी येत असल्याचे पाहून संशयितांनी कारमध्ये बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला. संशयित शहेनशहा शेख याने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी प्रसंगावधान राखून बाजूला होत गाडीच्या दरवाजांवर धक्के मारले. त्यामुळे संशयितांनी गाडीतून उतरून पळण्याचा प्रयत्न केला.

पोलीस पथकाने संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता मोहसिन कुरेशी याने पोलीस हवालदार संकेत महाडिक यांच्यावर धारदार चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पोलिसांनी शहेनशहा शेखला जागीच पकडले, तर मोहसिन आणि अस्लम यांनी जंगलाचा फायदा घेत पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून संपूर्ण जंगलात शोधमोहीम राबवली आणि गुरुवारी सकाळी मोहसिन कुरेशीला निष्पन्न करून ताब्यात घेतले.

गोमांसाची मुंबईत विक्री

संशयित अवघ्या ४० ते ४५ मिनिटांत एका गोवंशीय जनावराचे मांस काढत असत. मध्यरात्री १ ते पहाटे ४ या वेळेत मांस काढून त्याची थेट मुंबईत विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

इनोव्हा कारला बनावट नंबर

संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या इनोव्हा कारला बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. तपास केला असता ती नंबर प्लेट एका रिक्षाची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलीस पथकाच्या सातत्याला यश

जून महिन्यातील घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी या परिसरात सातत्याने पेट्रोलिंग सुरू ठेवले होते. दर १-२ तासांनी गस्त घालण्यासोबतच ग्रामस्थ आणि पोलीस पाटलांना जागृत ठेवण्यात आले होते. अखेर दोन महिन्यांच्या सततच्या प्रयत्नांनंतर पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आले.