ज्ञानकुंज कॉलेजच्या विद्यार्थिनींची एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या युवा महोत्सवात उल्लेखनीय यश..

वेंगुर्ले : प्रतिनिधी
ज्ञानकुंज कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, ओरोस, सिंधुदुर्ग येथील विद्यार्थिनींनी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबईच्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

पुणे येथील एम. के. एस. एस. एस. च्या के. बी. जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे पश्चिम विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ज्ञानकुंज कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्थळावर चित्रकला स्पर्धा (On the Spot Painting), सर्जनशील नृत्यदिग्दर्शन स्पर्धा (Creative Choreography), लोकनृत्य स्पर्धा (Folk Dance), पथनाट्य स्पर्धा (Street Play), भारतीय समूहगायन (Indian Group Song) आणि लघुनाटिका स्पर्धा (Skit) या विविध कलाप्रकारांमध्ये सहभाग घेतला.

सर्जनशील नृत्यदिग्दर्शन स्पर्धा या स्पर्धेत ज्ञानकुंज कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. त्यांच्या सादरीकरणातून कलात्मकता, सर्जनशीलता, सांघिक भावना आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडले. विद्यार्थिनींच्या या यशामागे संस्थेचे अध्यक्ष श्री. मानसपुरे सर, डी. एम. एल. टी. विभागप्रमुख प्राध्या. सीता परब मॅडम तसेच बी. सी. ए. विभागप्रमुख प्राध्या. सतिश कासले सर यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील शिक्षकवृंद व सहकाऱ्यांनीही विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सहभागी विद्यार्थिनींचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व कलात्मक क्षेत्रातील योगदानाला नवी ओळख मिळाली आहे.