ज्ञानदीप महाविद्यालयात रेड रिबन क्लबची स्थापना

खेड (प्रतिनिधी): ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य, मोरवंडे-बोरज येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. युवक-युवतींमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी जनजागृती निर्माण करणे, सुरक्षित आरोग्यविषयक सवयींबाबत माहिती देणे आणि एड्सविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक विलास म्हस्के प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांचे स्वागत प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही/एड्सचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाय, आरोग्यविषयक काळजी तसेच एचआयव्हीबाबत योग्य माहिती आणि जनजागृतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
रेड रिबन क्लबच्या माध्यमातून महाविद्यालयात व्याख्याने, जनजागृती रॅली, पोस्टर प्रदर्शन, पथनाट्य यांसह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जागरूकता आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. प्रिया बावकर यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा तसेच संस्थेच्या सर्व सभासदांनी या उपक्रमाचे कौतुक केले.