खेड मधील शिवतर-नामदरेवाडी रस्त्याला धोकादायक भेगा

गेल्या वर्षभरापासून वाहतूक ठप्प; नागरिकांची २ कि.मी. पायपीट कायम
खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवतर-नामदरेवाडी रस्त्यावर १९ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्याला भेगा पडल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून या मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद असून नागरिकांना २ कि.मी. पायपीट करावी लागत आहे.
शिवतर कोडबा धरणाच्या कामासाठी रस्त्याच्या खालील बाजूची माती काढण्यात आली होती. यामुळे आधीच रस्ता वाहून गेला असून आता पुन्हा या रस्त्याच्या भेगा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा करत आहेत. नामदरेवाडीतील सुमारे ७० घरे आणि शेतीला धोका निर्माण झाला आहे. यावर ठोस उपाययोजना न झाल्यास १५ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे सचिव सुनील मोरे यांनी दिला आहे.

स्थानिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष
शिवतर नामदरेवाडी रस्त्याच्या खालील बाजूने धरणाच्या कामासाठी माती काढण्यात आल्यामुळे हा रस्ता पुढील दोन चार वर्षात वाहून जाईल खचेल, याची लेखी तक्रार आम्ही शासनाकडे दिली होती. तरी देखील प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. आता नामदरेवाडी रस्त्याला मोठ मोठे तडे गेले असून रस्ता कोणत्याही क्षणी वाहून जाईल. सदरचे तडे धरणाकडे वळणाऱ्या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत धरणाच्या कामासाठी माती काढण्यात आल्यामुळे गेले आहेत, असा आरोप तक्रारदार ग्रामस्थांकडून होत आहे.