दोडामार्ग, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) च्या पथकाने दोडामार्ग शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या ‘कल्याण मटका’ जुगारावर धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळवणाऱ्या इसमांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ‘कल्याण’ मटक्याच्या चिठ्ठ्या आणि रोख ₹१०,९७५ इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबीच्या पथकाने शुक्रवारी आवाडे येथे गोवा बनावटीच्या अवैध दारू विक्रीवर केलेल्या कारवाईनंतर लगेच दुसऱ्याच दिवशी, शनिवारी दुपारच्या सुमारास दोडामार्ग शहरात एकूण तीन दुकानांवर धाडी टाकल्या. यापैकी दोन दुकानांमध्ये अवैधपणे ‘कल्याण मटका’ जुगार खेळवला जात असल्याचे निदर्शनास आले. एलसीबीच्या पथकाने जुगार चालवणाऱ्या इसमांना रंगेहाथ पकडले.
जप्त केलेला मुद्देमाल
कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून रोख ₹१०,९७५ रुपये आणि मटक्याचे साहित्य (कल्याण लिहिलेल्या चिठ्ठ्या) जप्त केले आहे.
याप्रकरणी संबंधित आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ मधील कलम १२(अ) अंतर्गत दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.










